अध्यक्षपदाचा अवमान खपवून घेणार नाही
By admin | Published: November 10, 2015 02:41 AM2015-11-10T02:41:49+5:302015-11-10T02:41:49+5:30
राजकारण्यांच्या भाऊगर्दीमुळे व्यासपीठावरून साहित्यिक दूर सारले जातात, हे नेहमीचेच चित्र असते. मात्र, याला आगामी संमेलनात पायबंद घातला जाण्याची शक्यता आहे.
पुणे : राजकारण्यांच्या भाऊगर्दीमुळे व्यासपीठावरून साहित्यिक दूर सारले जातात, हे नेहमीचेच चित्र असते. मात्र, याला आगामी संमेलनात पायबंद घातला जाण्याची शक्यता आहे. ‘अध्यक्षपदाचा अवमान खपवून घेणार नाही,’ असा सज्जड इशाराच नियोजित संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी दिल्याने, महामंडळाला आता काळजी घ्यावी लागणार आहे.
प्रथेप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेने सबनीस यांचा सत्कार केला, तेव्हा सबनीस यांनी कळीच्या मुद्द्याला हात घातला. ‘संमेलनाध्यक्षांचा अवमान खपवून घेणार नाही, त्यांचा अवमान म्हणजे राज्यातील अकरा कोटी जनतेचा अवमान आहे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. ‘घुमानच्या संमेलनात उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्षांना अंग चोरून उभे राहण्याची वेळ आली. ते बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांची खुर्ची इतरांनी बळकावली. अध्यक्षांचा मान राखला गेलाच पाहिजे,’ असेही ते म्हणाले.
‘राजकारणी व्यक्तींनी व्यासपीठावर असू नये, असे मी म्हणत नाही, पण संमेलनाध्यक्षांचा सन्मान राखणे, ही महामंडळाचीच जबाबदारी आहे,’ असे मत त्यांनी मांडले.