शेतकऱ्यांबाबतचा दुजाभाव खपवून घेणार नाही!
By admin | Published: August 31, 2015 01:29 AM2015-08-31T01:29:06+5:302015-08-31T01:29:06+5:30
मूठभर असलेले स्टील उत्पादक अडचणीत आल्यानंतर त्यांचे कर कमी करण्यासाठी केंद्र सरकार लगेच तयार झाले, मात्र कोट्यवधींच्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या मदतीसाठी पुढाकार
पुणे : मूठभर असलेले स्टील उत्पादक अडचणीत आल्यानंतर त्यांचे कर कमी करण्यासाठी केंद्र सरकार लगेच तयार झाले, मात्र कोट्यवधींच्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यास सरकार तयार नाही. महागाई कमी करण्याच्या नावाखाली शेतमालास कमी भाव देण्याचे प्रकार सरकारकडून सुरू आहेत. हा दुजाभाव खपवून घेतला जाणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघातर्फे आयोजित ५५ व्या अधिवेशनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त द्राक्ष बागाईतदार संघातर्फे ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर व माजी मंत्री विनायक पाटील यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
पवार म्हणाले, की महागाई कमी करण्यास आमचा विरोध नाही. शेतकऱ्यांना लागणारी खते, बी-बियाणे यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत़ त्याच्या किमती शासनाने अगोदर कमी कराव्यात. शेतकऱ्यांना स्वस्तात चांगली आरोग्यसेवा मिळावी, त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण उपलब्ध व्हावे. शेतकऱ्यांच्या गरजेच्या वस्तूंच्या किमती कमी कराव्यात. शेती अर्थव्यवस्थेचा विचार करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांकडे पैसा आला तर बाजारातील मंदीचे वातावरण दूर होऊ शकेल. दीर्घ मुदतीची कर्जे कमी व्याजदराने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सध्या शेतीचा सगळ्यात मोठा प्रश्न पाणी हा आहे. जुलै, आॅगस्ट कोरडा गेला आता सगळी मदार सप्टेंबरवर आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये ५० हजार शेततळी उभारण्याचे काम हाती घेतले पाहिजे.
कांद्याचे दर वाढले की लगेच त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. मात्र सर्वसामान्य माणसाचा कांद्यावर होणारा दररोजचा खर्च अगदीच नगण्य आहे याचा विचार केला पाहिजे. शेतमालाला चांगली किंमत मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी पवार यांचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार ना. धो. महानोर यांनी काढले. संघाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.