जुना-नवा वाद उफाळणार?
By admin | Published: March 3, 2017 01:31 AM2017-03-03T01:31:56+5:302017-03-03T01:31:56+5:30
कार्यकर्त्यांना न्याय न दिल्याने निदान स्वीकृत सदस्यपदासाठी, तसेच शासकीय समित्यांवर संधी देण्याचा विचार व्हावा
पिंपरी : महापालिका निवडणुकीत क्षमता असूनही उमेदवारीत डावलले गेलेले, तीस वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय न दिल्याने निदान स्वीकृत सदस्यपदासाठी, तसेच शासकीय समित्यांवर संधी देण्याचा विचार व्हावा, असे साकडे भाजपातील नाराज गटाने थेट मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना घातले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची उमेदवारी जाहीर झाली. त्यात ज्यांना डावलले त्यांनी पक्ष कार्यालयासमोरच नाराजी व्यक्त केली. पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्यानंतर निवडणुकीतही पक्षाचे काम केले. आता महापालिकेत एकहाती सत्ता आल्यानंतर हा जुना गट पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यांनी ३१ जणांची यादी तयार केली असून या यादीतील कोणत्याही तिघांना स्वीकृत सदस्यपदी संधी द्यावी, तसेच इतरांचा अन्य शासकीय समित्यांसाठी विचार करावा, असे या गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सूचित केले आहे.
स्वीकृत सदस्यपदासह अन्य समित्यांवर संधी दिल्यास त्यांच्यावर झालेला अन्याय दूर होईल, अशी त्यांची भावना आहे. त्यांनी केलेल्या या मागणीमुळे आता पुन्हा जुना-नवा असा वाद उफाळून येणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत तीन नगरसेवक संख्या असलेल्या भारतीय जनता पार्टीने थेट ७७ नगरसेवकांपर्यंत मजल मारली आहे. काही महिन्यांपूर्वीच आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे हे भाजपामध्ये डेरेदाखल झाले. पक्षसंघटना मजबूत होईल. या दृष्टीने त्यांना प्रवेश देण्यात आले. मात्र, या प्रवेशामुळे भाजपाचे काही जुने पदाधिकारी अस्वस्थ झाले. महापालिका निवडणुकीत आपणाला कितपत संधी मिळणार याबाबत तेही साशंक होते. दरम्यान, आपण निष्ठावान असून, संधी मिळेल अशी त्यांना आशा होती. मात्र, उमेदवारी जाहीर झाली त्या वेळी त्यांची आशा फोल ठरली. वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलून काही दिवसांपूर्वीच पक्षात आलेल्यांना संधी देण्यात आल्याबाबत संताप व्यक्त केला. जुन्या गटातील पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठकही घेतली. जुन्या, नव्यांचा वाद समोर आला असतानाच जुन्या पदाधिकाऱ्यांना समजाविण्यात पक्ष पदाधिकाऱ्यांना यश आले.
दरम्यान, आता महापालिका निवडणूकही पार पडली असून, घवघवीत यश संपादन केले आहे. भाजपाला ७७ जागा मिळाल्या असून, या संख्याबळानुसार स्वीकृत सदस्य पदाच्या पाचपैकी तीन जागा भाजपाच्या वाट्याला येतात. त्यामुळे या तीन जागांवर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.
(प्रतिनिधी)
>नगरसेवकांची संख्या : मूळचे भाजपचे कमीच
नव्याने निवडून आलेल्या एकूण नगरसेवकांपैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत संख्या सोडली, तर भाजपाचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले सर्वच नगरसेवक इतर पक्षांतून आलेले आहेत. मूळ भाजपाचे असलेल्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्यपदी तरी जुन्या, निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे. अशातच शहरातील भाजपाच्या जुन्या ३१ कार्यकर्त्यांनी याबाबतची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. भाजपात ३० वर्षांपासून सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, असेही त्यामध्ये नमूद आहे. त्यामुळे आता भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाते, की नव्याने पक्षात आलेल्यांपैकी कोणाच्या तरी डोक्यावर स्वीकृतचा मुगुट चढविला जातो. याकडे लक्ष लागले आहे. स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीवरून जुन्या-नव्या गटाचा वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.