भुजबळांना उमेदवारी दिल्यास ४८ मतदारसंघांत विरोध; मराठा समाजाचा महायुतीला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 03:53 PM2024-04-06T15:53:06+5:302024-04-06T15:53:36+5:30
Maratha Samaj on Chagan Bhujbal Nashik Loksabha: भुजबळ तयार नव्हते त्यांना घोड्यावर बसविले जात आहे. भुजबळांना उमेदवारी देऊन महायुती मराठा समाजाला डिवचत आहे. मराठा समाजाचे महायुतीवर आरोप
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या मागण्यांना विरोध करत ओबीसी सभा घेतल्या होत्या. यावरून मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली होती. आता महायुती भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. यावर मराठा समाजाने राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाला थेट इशारा दिला आहे.
मराठा समाजाचे नेते करण गायकर यांनी पत्रकार परिषदेत हा इशारा दिला आहे. छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याचे संकेत आहेत. एखादा नेता एखाद्या समाजाला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवतो, त्या भुजबळांना महायुतीकडून पायघड्या घातल्या जात आहेत. आम्ही कुठल्याही उमेदवारासाठी पत्रकार परिषद घेत नाही. परंतु जातीयवादी छगन भुजबळ यांनी समाजात वाद लावले, यामुळे त्यांना उमेदवारी देऊन पायावर धोंडा पाडून घेऊ नका, असा इशारा गायकर यांनी दिला आहे.
आमचा पंकजा मुंडे, महादेव जानकर यांना विरोध नाही. सर्व्हे करणाऱ्यांनी मराठा नाहीतर 18 पगड जातींना विचारा, भुजबळांना निवडून द्याल का म्हणून. भुजबळांना उमेदवारी देऊन महायुती मराठा समाजाला डिवचत आहे. भुजबळांना उमेदवारी दिली तर 48 मतदार संघात आम्ही विरोध करू. नाशिक जिल्ह्यात भुजबळांना पाडल्याशिवाय राहणार नाही. दोनदा पराभूत झालेल्या भुजबळांना उमेदवारी का दिली जातेय असा सवाल करत देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी यांना उमेदवारी देऊ शकता असेही म्हटले आहे.
भुजबळांना उमेदवारी देऊ नका त्यांना आम्ही पाडू, उद्या ते म्हणतील महाविकास आघाडीला पूरक भूमिका घेत आहे. परंतु समाज ठरवेल कुणाला मतदान करायचे आहे ते. भुजबळांची भूमिका आम्हाला मान्य नाही. छगन भुजबळ उभे राहणार असतील तर मी स्वतः उभा राहीन. आम्ही समाजाचा उमेदवार देऊ. भुजबळांना उमेदवारी दिली तर महायुतीला फटका बसेल. भुजबळ तयार नव्हते त्यांना घोड्यावर बसविले जात आहे. भुजबळ फार्मवर जाणारे मराठे भुजबळांना घाबरतात म्हणून काही लोक आले नाहीत, असा आरोपही गायकर यानी केली आहे.