शिवसेनेसारखा मर्दानी स्वाभिमान दाखवायची हिंमत अन्य पक्ष दाखवणार ? - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 07:37 AM2018-02-05T07:37:52+5:302018-02-05T07:44:50+5:30

केंद्रीय अर्थसंकल्पातून अपेक्षाभंग झाल्याने आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भाजपावर नाराज झाले आहेत. भाजपच्या वागणुकीने त्यांचा तिळपापड झाला असला तरी त्यांच्या युतीचा पापड टीचभर तरी तुटेल काय?

Will the other parties show courage to take stand like shivsena - Uddhav Thackeray | शिवसेनेसारखा मर्दानी स्वाभिमान दाखवायची हिंमत अन्य पक्ष दाखवणार ? - उद्धव ठाकरे

शिवसेनेसारखा मर्दानी स्वाभिमान दाखवायची हिंमत अन्य पक्ष दाखवणार ? - उद्धव ठाकरे

Next
ठळक मुद्देसध्या जुन्या मित्रांना हाडवैरी ठरवून जी सत्तालोलुपता दाखवली जात आहे ती उबग आणणारी आहे. एनडीएतील इतर घटक पक्षांनीही अनेकदा बाहेरख्यालीपणा केला आहे.

मुंबई -  केंद्रीय अर्थसंकल्पातून अपेक्षाभंग झाल्याने आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भाजपावर नाराज झाले आहेत. भाजपच्या वागणुकीने त्यांचा तिळपापड झाला असला तरी त्यांच्या युतीचा पापड टीचभर तरी तुटेल काय? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून चंद्राबाबूंना विचारला आहे. चंद्राबाबू नायडूंनी मातोश्रीवर फोन केल्याचे आपल्याला वर्तमानपत्रातून कळले असेही त्यांनी अग्रलेखात म्हटले आहे.  

सध्या जुन्या मित्रांना हाडवैरी ठरवून जी सत्तालोलुपता दाखवली जात आहे ती उबग आणणारी आहे. आम्हीच ही ‘उबग’ स्पष्टपणे समोर आणली, पण आता चंद्राबाबूंनीही ती खदखद बाहेर काढली. चंद्राबाबूंना आमच्या शुभेच्छा आहेत, पण त्यांच्या राजकीय मसलती त्यांनीच कराव्यात असा सल्ला लेखातून देण्यात आला आहे. 
 

शिवसेनेने २०१९च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक स्वाभिमानी भूमिका नक्कीच घेतली आहे, पण असा मर्दानी स्वाभिमान दाखवायची हिंमत यापुढे कोण दाखवणार आहेत? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे.        
शिवसेना व तेलुगू देसम पक्षात जमीन अस्मानचे अंतर आहे. अंतर विचारधारेत आहे तसे कार्यपद्धतीत आहे. शिवसेना हा प्रखर हिंदुत्ववादी अशा धारदार विचारांचा पक्ष आहे व त्यासाठी तलवारीच्या धारेवरून चालण्याची आमची तयारी आहे. हिंदुत्वाचा खून होणार असेल तर सत्तेची गुलामी करण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही. तसे तेलुगू देसम किंवा एनडीएतील इतर घटक पक्षांचे आहे काय? असा प्रश्न लेखातून विचारला आहे. 

काय म्हटले आहे अग्रलेखात 
- सध्या जुन्या मित्रांना हाडवैरी ठरवून जी सत्तालोलुपता दाखवली जात आहे ती उबग आणणारी आहे. आम्हीच ही ‘उबग’ स्पष्टपणे समोर आणली, पण आता चंद्राबाबूंनीही ती खदखद बाहेर काढली. चंद्राबाबूंना आमच्या शुभेच्छा आहेत, पण त्यांच्या राजकीय मसलती त्यांनीच कराव्यात. महाराष्ट्रात ममता बॅनर्जी मध्यंतरी येऊन गेल्या. त्यांनाही सदिच्छा म्हणून भेटलो. आम्ही त्यांना भेटलो यावरही अनेकांनी तर्ककुतर्कांची फवारणी केली. आता चंद्राबाबूंच्या बाबतीत तेच सुरू आहे. एनडीएतील इतर काही नेत्यांनी ‘मातोश्री’चा फोन फिरवलाय हे लवकरच आम्हाला वृत्तपत्रांतून कळेल अशी आशा आम्ही बाळगत आहोत.

- श्री. चंद्राबाबू नायडू व आमच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली असे बोलले जात आहे. असे बोलल्याचे आम्ही राष्ट्राच्या चौथ्या स्तंभात वाचले आहे. भिंतीलाही कान असतात हे आम्ही ऐकून होतो, पण आता दूरध्वनीलाही कान लागलेत की काय अशी शंका येऊ लागली आहे. श्री. नायडू हे आमच्याशी खरेच बोलले काय व नेमके काय बोलले यावर आता तर्कवितर्क लढवून चौथा स्तंभ ‘सब से तेज’ पत्रकारितेचे दर्शन घडवीत आहे. शिवसेनेने २०१९च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक स्वाभिमानी भूमिका नक्कीच घेतली आहे, पण असा मर्दानी स्वाभिमान दाखवायची हिंमत यापुढे कोण दाखवणार आहेत? केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशच्या तोंडास पाने पुसली व ज्या घोषणा आंध्रच्या बाबतीत केल्या होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या नावाने खडे फोडत चंद्राबाबूंनी भाजपविषयी नाराजी व्यक्त केली. चंद्राबाबू यांनी त्याआधी असेही सांगितले आहे की, भाजप नेते तेलुगू देसमवर बेताल तोंडसुख घेत आहेत. आपल्या नेत्यांना रोखणे ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची जबाबदारी आहे, पण असे होताना दिसत नाही. 

- अर्थात चंद्राबाबू यापेक्षा बरेच काही बोलले आहेत व भाजपच्या वागणुकीने त्यांचा तिळपापड झाला असला तरी त्यांच्या युतीचा पापड टीचभर तरी तुटेल काय? शिवसेना व तेलुगू देसम पक्षात जमीन अस्मानचे अंतर आहे. अंतर विचारधारेत आहे तसे कार्यपद्धतीत आहे. शिवसेना हा प्रखर हिंदुत्ववादी अशा धारदार विचारांचा पक्ष आहे व त्यासाठी तलवारीच्या धारेवरून चालण्याची आमची तयारी आहे. हिंदुत्वाचा खून होणार असेल तर सत्तेची गुलामी करण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही. तसे तेलुगू देसम किंवा एनडीएतील इतर घटक पक्षांचे आहे काय? रामविलास पासवान हे एनडीएचे नवे समर्थक आहेत, पण हिंदुत्व, राममंदिर, समान नागरी कायदा याबाबत त्यांचे मत काय आहे? शिवसेनेने भाजपची साथ कधीच सोडली नाही. त्यामुळे राजकीय तत्त्व, नीतिमत्ता, युतिधर्म यावर स्वतःची परखड मते मांडण्याचा अधिकार आम्हाला आहे. तेलुगू देसमने काँग्रेस आघाडीत सत्तासुख चाखले आहे. तसेच एनडीएतील इतर घटक पक्षांनीही अनेकदा बाहेरख्यालीपणा केला आहे.

-  शिवसेना व अकाली दल वगळता प्रत्येकावर हा राजकीय बाहेरख्यालीपणाचा डाग लागला आहे. आम्हाला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू व मित्र नसतो. राजकारणात विचारांचे भांडण असावे, पण व्यक्तिगत शत्रुत्व किंवा हाडवैर असू नये हे खरेच आहे, पण सध्या चित्र काय आहे? सत्तेत आल्यावर किंवा सत्ता मिळविण्यासाठी जुन्या राजकीय मित्रांना दूर करायचे हा जणू सत्ताकारणाचा मूलमंत्रच झाला आहे. 

- भाजपच्या मंडळींचा तर हा जुनाच खेळ आहे. स्वतःच्या राजकीय लाभहानीचा विचार न करता बऱ्या-वाईट काळात खंबीरपणे साथ देणाऱया घटक पक्षांना सत्ता मिळाल्यावर बाजूला सारायचे हा प्रकार भाजपवाल्यांनी अनेकदा केला आहे. आताही नागालॅण्डमध्ये ‘नागा पीपल्स फ्रंट’ या मित्रपक्षाशी असलेले १५ वर्षांपासूनचे नाते भाजपने तोडले असून नव्याने स्थापन झालेल्या ‘नॅशनॅलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेऩसिव्ह पार्टी’ या पक्षाशी आघाडी केल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. राजकारणात जुने-नवे व्हायचेच, पण सध्या जुन्या मित्रांना हाडवैरी ठरवून जी सत्तालोलुपता दाखवली जात आहे ती उबग आणणारी आहे. आम्हीच ही ‘उबग’ स्पष्टपणे समोर आणली, पण आता चंद्राबाबूंनीही ती खदखद बाहेर काढली. चंद्राबाबूंना आमच्या शुभेच्छा आहेत. गुलामीचे जोखड फेकून ‘तेलुगू’ स्वाभिमानाच्या मुद्दय़ावर ते दाढीला गाठ मारणार असतील तर जनता नक्कीच त्यांच्या पाठीशी उभी राहील, पण त्यांच्या राजकीय मसलती त्यांनीच कराव्यात. महाराष्ट्रात ममता बॅनर्जी मध्यंतरी येऊन गेल्या. त्यांनाही सदिच्छा म्हणून भेटलो. कधीकाळी त्याही अटल बिहारी वाजपेयींच्या काळात ‘एनडीए’च्या घटक होत्या. आम्ही त्यांना भेटलो यावरही अनेकांनी तर्ककुतर्कांची फवारणी केली. आता चंद्राबाबूंच्या बाबतीत तेच सुरू आहे. एनडीएतील इतर काही नेत्यांनी ‘मातोश्री’चा फोन फिरवलाय हे लवकरच आम्हाला वृत्तपत्रांतून कळेल अशी आशा आम्ही बाळगत आहोत.
          

Web Title: Will the other parties show courage to take stand like shivsena - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.