पंतप्रधान दुष्काळ पाहणी करतील ?
By admin | Published: September 6, 2015 01:59 AM2015-09-06T01:59:53+5:302015-09-06T01:59:53+5:30
बिहारमध्ये निवडणूक आहे म्हणून सव्वा लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करणाऱ्या पंतप्रधानांना महाराष्ट्रावर अतिशय भीषण दुष्काळाचे संकट असतानाही येथे यायला वेळ मिळालेला नाही.
बिहारला निवडणुकीमुळे सव्वा लाख कोटींचे पॅकेज, पण महाराष्ट्राकडे दुर्लक्ष...
मुंबई : बिहारमध्ये निवडणूक आहे म्हणून सव्वा लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करणाऱ्या पंतप्रधानांना महाराष्ट्रावर अतिशय भीषण दुष्काळाचे संकट असतानाही येथे यायला वेळ मिळालेला नाही. भाजपाचे राज्यातील सरकार दुष्काळी उपाययोजनांबाबत संपूर्णत: अपयशी ठरल्याने परिस्थिती स्फोटक झाली आहे. त्यामुळे आतातरी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन केंद्राच्या वतीने भरीव मदत जाहीर करतील का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कार्यालयात शनिवारी दुपारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले, मालदीवसारख्या देशाला विमानाने आणि जहाजाने पाणीपुरवठा होतो.
मात्र, महाराष्ट्रातील कोरड्या पडलेल्या गावांकडे बघायला केंद्र सरकारला वेळ मिळालेला नाही. दुष्काळग्रस्त भागाला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याच्या घोषणा केल्या जातात. परंतु, मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून नियोजन केल्याचे दिसून येत नाही. दुष्काळाने होरपळून निघालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्राने अद्याप भरीव मदत दिलेली नाही, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, माणिकराव ठाकरे, आ. संजय दत्त आदी उपस्थित होते.