नागपूरमध्ये सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करणार
By admin | Published: March 13, 2016 04:17 PM2016-03-13T16:17:19+5:302016-03-13T16:17:19+5:30
शहरातील नागरिकांना उत्कृष्ट रस्ते, वीज आणि २४ x७ पाणीपुरवठा यांसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार. यासाठी निधी कमी पडणार नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर दि. १३ - शहरातील नागरिकांना उत्कृष्ट रस्ते, वीज आणि २४ x७ पाणीपुरवठा यांसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार. यासाठी निधी कमी पडणार नाही. शहरातील प्रत्येक मतदारसंघाला पूर्वीचे 50 आणि नव्याने 25 कोटी रुपये लवकरच देणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पहिल्या 20 स्मार्ट शहरांमध्ये नागपूर आले नाही. ही तांत्रिक अडचण होती. असे असले तरीही केंद्र शासनाने यापूर्वीच राज्यातील दोन शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून एप्रिलमध्ये जाहीर होणा-या यादीत नागपूर शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश होणारच, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नागपूर सुधार प्रन्यास व महानगरपालिका आणि राज्य शासन यांच्या संयुक्त निधीतून शहरातील मुख्य रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरण फेज -2 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुदळ मारुन सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे उद्घाटन केले.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ परिवहन,महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार बनवारीलाल पुरोहीत, महापौर प्रवीण दटके, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, गिरीश व्यास, प्रकाश गजभिये, माजी महापौर मायाताई इवनाते, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, स्थायी समितीचे सभापती सुधीर राऊत, नगरसेवक सर्वश्री नरेंद्र बोरकर, श्रीमती प्रगती पाटील, संगिता गिऱ्हे, साधना बर्डे यांच्यासह नगरसेवक आणि विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांची उपस्थिती होती.
युती शासनाच्या काळात नितीन गडकरी यांनी सिमेंट काँक्रीटीकरणाच्या रस्ते बांधकाम केले. त्या रस्त्यांना दुरुस्तीसाठी अद्याप निधीची आवश्यकता पडली नाही. त्यामुळे शहरातील अविकसित भागांचा विकास करण्यास मदत होत असल्याचे ते म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रीभूत ठेवून गरिबांच्या हितासाठी काम करण्याकडे अधिक भर दिला. अनधिकृत ले आऊटमधील विकासाला सध्या प्राधान्य देण्यात येत असले तरीही यापुढे अनधिकृत लेआऊट उभारणाऱ्या बिल्डरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
सद्यस्थितीतील अनधिकृत लेआऊटपैकी निम्मे लेआऊट नियमित करण्यात येतील. यापुढे नागपूर सुधार प्रन्यास, मनपा आणि जिल्हाधिकारी यांनी यासाठी सॅटेलाईट प्रतिमांची मदत घेण्याची सूचना केली. गरीब जनतेचे हित लक्षात घेऊन अनियमित लेआऊटला नियमित करण्यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयाचा सल्ला घेऊन नियमांत बदल केला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या सर्वसमावेशक आरक्षणाच्या निर्णयामुळे नागपूरच नव्हे तर राज्यातील दिघी (नवी मुंबई), पिंपरी चिंचवडमधील 25 लाख गरीबांना फायदा होणार आहे. राज्यातील बिल्डरधार्जिणी मानसिकता असणाऱ्यांना चांगली कामे *दिसतच नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शहरांचा सर्वांगीण विकास करण्याकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह त्यांचेही विशेष लक्ष असल्याचे सांगून ते म्हणाले की, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली मिहान आणि सेझमध्ये नवनवे उद्योग येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात प्रमुख बदल घडून येत आहेत. नागपुरातील युवकांना तब्बल 15 वर्षांनंतर रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नितीन गडकरी
केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहरातील सिमेंट रस्ते काँक्रीटीकरण हे नासुप्र, महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या निधीतून करण्यात येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. तसेच ही महानगरपालिका देशातच नव्हे तर जगात अव्वल आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शहरात सिमेंट काँक्रीटीकरणामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुढील 50 वर्षे 1 रुपयांचाही निधी खर्च होणार नसल्याचे सांगून विमानतळाजवळील राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो रेल्वे ही एकाच पुलावरुन जाणार आहे. त्यासाठी छत्रपती चौकातील उड्डाणपूलही पाडण्यात येणार असल्याचे सांगितले. त्या ठिकाणी विमानतळापासून ते कामठीपर्यंत चौपदरी सिमेंटचा रस्ता बनविण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोचा विस्तार हा विमानतळापासून ते जिल्ह्यातील कन्हान, कामठी, कळमेश्वर, हिंगणा एमआयडीसीपर्यंत करण्यात येणार असल्याचे सांगितले.
नागपुरातील 150 शहर बसेस जैवइंधनावर चालविण्यात येतील. नागपूर शहराला जगात स्वच्छ, सुंदर, हरित, प्रदूषणमुक्त आणि स्मार्ट बनविण्यासाठी वीज, 24x7 स्वच्छ पाणी, पक्के रस्ते, आरोग्यासह सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. हरीतपट्टयातील गरीबांच्या घरांना या मूलभूत सुविधा पुरवू. पण यापुढे अनधिकृत बांधकामे पाडण्यात येतील, असे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
महापौर प्रवीण दटके यांनी नासुप्र, मनपा आणि राज्य शासनाने रस्ते सिमेंट कॉक्रीटीकरणास निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रास्ताविकातून विकासकामांची थोडक्यात माहिती दिली.