राज-उद्धव एकत्र येणार? चर्चांवर ठाकरे गटाकडून अशी प्रतिक्रिया, चंद्रकांत खैरे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 02:38 PM2023-07-06T14:38:30+5:302023-07-06T14:39:12+5:30
Raj Thackeray & Uddhav Thackeray: महाराष्ट्रात घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींदरम्यान, आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपापसातील मतभेद विसरून एकत्र येणार, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींदरम्यान, आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपापसातील मतभेद विसरून एकत्र येणार, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दरम्यान, आज मनसेने नेते अभिजित पानसे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एकत्र येण्याबातचा प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि एकत्र यावेत, अशी अनेकांची इच्छा आहे, असे ते म्हणाले.
मनसे नेते अभिजित पानसे आणि संजय राऊत यांची आज अचानक भेट झाल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उघाण आले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, राज ठाकरे यांनी अभिजित पानसे यांना संजय राऊत यांच्याकडे पाठवून युतीचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर आता चर्चा होईल. तसेच त्याचं फलित चांगलं असेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत म्हणून सर्व जनता वाट पाहतेय. पण सध्या काही म्हणता येणार नाही. मात्र अनेकांची इच्छा आहे.
यावेळी खैरे यांनी भाजपावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजपा हा एकच पक्ष देशात राहिला पाहिजे, असे त्यांचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते. कुठल्याही प्रादेशिक पक्षाला शिल्लक ठेवायचं नाही, हे त्यांचं धोरण आहे. भाजपाचा हा डाव असेल तर तो कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. कारण प्रादेशिक पक्षांमुळे आमच्यासारखे नेते मोठे झाले आहेत, असे ते म्हणाले.
यावेळी फोडाफोडीच्या राजकारणावरून खैरे यांनी देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला. ते म्हणाले. भाजपाने ज्या पद्धतीने शिवसेना फोडली त्यात देवेंद्र फडणवीस यांचा खूप मोठा हात आहे. त्यांना मुख्यमंत्रिपदावरून जावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी मोदी शाहांच्या मदतीने आणि आमचे आमदार फोडून शिवसेना फोडण्याचं कारस्थान केलं. त्यात उद्धव ठाकरेंनी मोठी खाती दिलेल्या व्यक्तीने त्यांना साथ दिली. या दोघांनीही मिळून शिवसेनेचा घात केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद काही मिळालं नाही. त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. मात्र त्यानंतरही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. तिथे त्यांना काका आणि पुतण्याचं भांडण लावून दिलं. घराघरात भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटतेय की तो प्रयत्न यशस्वी होईल, पण तो यशस्वी होणार नाही, असेही खैरे यांनी सांगितले.