'अभिव्यक्ती'च्या नावाखाली रामगोपाल वर्मा सटकणार ? - उद्धव ठाकरे
By admin | Published: March 10, 2017 08:00 AM2017-03-10T08:00:48+5:302017-03-10T08:00:48+5:30
प्रशांत परिचारक यांनी सैनिक पत्नींचा केलेला अपमान जितका निषेधार्ह आहे तितकेच रामगोपाल वर्माने केलेले वक्तव्य संतापजनक आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - जागतिक महिलादिनी समस्त महिला वर्गाबद्दल अत्यंत अपमानास्पद टि्वट करणारा दिग्दर्शक रामगोपाल वर्मा अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कायद्याच्या कचाटयातून सटकणार का ? असा प्रश्न शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे.
सैनिक पत्नींचा अपमान करणारे भारतीय जनता पक्षाचे ‘पंढरपुरी’ आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. राजकारण्यांना झोडपून काढणे सध्या सहज आणि सोपे झाले आहे, पण ‘अभिव्यक्ती’ व ‘कला’ या गोंडस नावाखाली खान, भन्साळी व रामगोपाल वर्मा सटकतात याकडे उद्धव यांनी लक्ष वेधले आहे.
प्रशांत परिचारक यांनी सैनिक पत्नींचा केलेला अपमान जितका निषेधार्ह आहे तितकेच रामगोपाल वर्माने केलेले वक्तव्य संतापजनक असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. सनी लिओनचे जे काही वादग्रस्त आयुष्य असेल ते असेल, पण तिच्या आयुष्याचाही असा उद्धार करण्याचा अधिकार रामगोपालसारख्यांना कोणी दिला? ‘अभिव्यक्ती’ व ‘कला’ या गोंडस नावाखाली खान, भन्साळी व रामगोपाल वर्मा सटकतात. हे सटकणे हाच देशभक्तीचा विश्वासघात आहे असे उद्धव यांनी म्हटले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- प्रशांत परिचारक या आमदारावर त्याने सैनिक पत्नींचा अपमान केल्याबद्दल आता निलंबनाची कारवाई झाली आहे. शेवटी राजकारण्यांना झोडपून काढणे सध्या सहज आणि सोपे झाले आहे, पण ‘अभिव्यक्ती’ व ‘कला’ या गोंडस नावाखाली खान, भन्साळी व रामगोपाल वर्मा सटकतात. प्रशांत परिचारक यांनी सैनिक पत्नींचा केलेला अपमान जितका निषेधार्ह आहे तितकेच रामगोपाल वर्माने केलेले वक्तव्य संतापजनक आहे. रामगोपाल वर्मासारख्यांना समाजात व निदान महाराष्ट्रात ताठ मानेने जगण्याचा अधिकार नाही. रामगोपालसारख्यांची जागा तुरुंगातच आहे. ‘पारदर्शक’ सरकारने हे लक्षात ठेवले पाहिजे!
- अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे सध्या घडताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाचे ‘पंढरपुरी’ आमदार प्रशांत परिचारक यांच्या विकृत जिभेचे प्रकरण गाजत असतानाच रामगोपाल वर्माच्या घाणेरड्या वक्तव्याने सर्वत्र दुर्गंधीचा फैलाव झाला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त माताभगिनींवर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू असताना या रामगोपाल वर्माने त्याच्या गटारी तोंडातून मायभगिनींचा अपमान व अपराध केला आहे. समस्त महिलांनी पुरुषांना सनी लिओनसारखा आनंद द्यावा, अशा प्रकारचे एक फालतू व घाणेरडे वक्तव्य करून या वर्माने आमच्या संस्कृतीवरच पिचकाऱ्या मारल्या आहेत. जागतिक महिला दिन वगैरे राहू द्या बाजूला, पण देशातील सर्वच मायभगिनींचा हा अपमान आहे.
- रामगोपाल वर्मा काय किंवा त्याच्या सिनेमाधंद्यातील इतर भाईबंद काय; कला, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली जो चिखल तुडवीत असतात तो त्यांचा धंदा आहे. पण धंदा झाला म्हणून देश किंवा महिलांच्या इज्जतीवर चिखल फेकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अशा प्रकारचे शेण खाऊन उघडेनागडे नाचण्याचा प्रकार रामगोपालने याआधीही केला आहे व प्रत्येक वेळी तो कायद्याच्या कचाटय़ातून सहीसलामत सटकला आहे. हिंदी सिनेमावाले पाकडय़ा कलाकारांना इकडे आणून त्यांचा उदो उदो करतात व ही आमची कला तसेच अभिव्यक्ती आहे या नावाखाली धुडगूस घालतात. तिकडे सीमेवर पाकड्यांच्या गोळीबारात आमच्या जवानांनी रोज मरायचे व इकडे हिंदी सिनेमावाल्यांनी पाकड्यांशी ‘धंदा’ करायचा. पुन्हा शिवसैनिकांनी या प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवताच सरकारातील वर्मा-खानांचे मायबाप शिवसैनिकांनाच गुन्हेगार ठरवतात. हे असले दळभद्री प्रकार सध्याच्या राजवटीत वाढीस लागलेच आहेत.
- वर्मा समस्त मायभगिनींची तुलना सनी लिओनशी करतो ही विकृती आहे. दुसऱ्या बाजूला संजय लीला भन्साळीचा ‘राणी पद्मावती’ चित्रपट ‘रजपूत’ मंडळींच्या संतापास कारण ठरला. ज्या राणी पद्मावतीने मोगली अत्याचाराविरोधात हजारो रजपूत वीरांगनांसोबत चितोडच्या किल्ल्यावर ‘जोहार’ केला त्याच पद्मावतीचे अल्लाउद्दीन खिलजीसोबत प्रेमसंबंध वगैरे दाखवून समस्त पतिव्रता महिलांचा अपमान करण्याचा प्रकार भन्साळी यांनी केला. त्यावरून जयपुरात या महाशयांनी बेदम चोपही खाल्ला. भन्साळी यांनी त्यांच्या चित्रपटात अफझल खानाचा कोथळादेखील मग बाहेर काढून दाखवावा किंवा शाहिस्तेखानाची बोटे छाटून दाखवावीत. चित्रपट हा व्यवसाय आहे हे मान्य केले तरी त्यासाठी इतिहास आणि समाज ज्यांना आदर्श मानतो त्यांचे तुम्ही किती विद्रूपीकरण करणार? कला आणि कलास्वातंत्र्याच्या नावाखाली किती व्यापारीकरण करणार? वर्मा काय किंवा भन्साळी काय यांच्या डोक्यातून अशा विकृतीचे किडे वळवळतात याचाच संताप येतो.
- सनी लिओनचे जे काही वादग्रस्त आयुष्य असेल ते असेल, पण तिच्या आयुष्याचाही असा उद्धार करण्याचा अधिकार रामगोपालसारख्यांना कोणी दिला? या देशात सीता, जिजाऊ, सावित्री, झाशीची राणी यांच्यासारख्यांनी स्त्रीत्वाला एक वेगळे स्थान मिळवून दिले. त्यांचा सन्मान करणाऱ्या या देशाने गांधारी, कुंती, द्रौपदी यांचाही कधी अनादर केला नाही. त्यांनाही आदराचे स्थान दिले. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेस लुटीतला माल न समजता तिची खणानारळाने ओटी भरून परत पाठविणाऱ्या शिवराय व जिजाऊंच्या संस्कृतीचे आम्ही पहारेकरी आहोत. पण वर्मासारख्यांच्या खोपडीत हे घालायचे कोणी? प्रशांत परिचारक या आमदारावर त्याने सैनिक पत्नींचा अपमान केल्याबद्दल आता निलंबनाची कारवाई झाली आहे. शेवटी राजकारण्यांना झोडपून काढणे सध्या सहज आणि सोपे झाले आहे, पण ‘अभिव्यक्ती’ व ‘कला’ या गोंडस नावाखाली खान, भन्साळी व रामगोपाल वर्मा सटकतात. हे सटकणे हाच देशभक्तीचा विश्वासघात आहे.
- आम्ही किंवा आमचा देश धर्मांध विचारांचा किंवा तालिबानी प्रवृत्तीचा नाही. जर मुसलमानी महिलांच्या बुरख्यांना येथे विरोध होत असेल तर हिंदू स्त्रीयांनाही तितकेच स्वातंत्र्य आपण दिले पाहिजे आणि झेप घेण्याचे धाडस त्यांच्यात निर्माण केले पाहिजे. प्रशांत परिचारक यांनी सैनिक पत्नींचा केलेला अपमान जितका निषेधार्ह आहे तितकेच रामगोपाल वर्माने केलेले वक्तव्य संतापजनक आहे. रामगोपाल वर्मासारख्यांना समाजात व निदान महाराष्ट्रात ताठ मानेने जगण्याचा अधिकार नाही. थातुरमातुर चौकशा व कारवायांनी समाधान होणार नाही. रामगोपालसारख्यांची जागा तुरुंगातच आहे. ‘पारदर्शक’ सरकारने हे लक्षात ठेवले पाहिजे!