रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात उतरणार?; संजय राऊतांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 07:49 PM2023-04-19T19:49:00+5:302023-04-19T19:50:08+5:30
आदित्य ठाकरेंचे नेतृत्व लोकांना कमालीचे आवडू लागले आहेत असं कौतुक संजय राऊतांनी केले.
मुंबई - शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यावर लक्ष दिले आहेत. त्यात आदित्य ठाकरे प्रामुख्याने पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे पुढील नेतृत्व आदित्य ठाकरेंकडे असेल, पण उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात उतरणार का? या प्रश्नावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे १५-२० वर्ष राजकारणात सक्रीय आहेत. त्यांना राजकारणात एक कालखंड लोटला. आमदार, मंत्री, पक्षाचे नेते म्हणून ते काम करतायेत. रश्मीवहिनी महिलांच्या कामासंदर्भात सक्रीय असतात. जिथे जिथे महिलांवर अन्याय होतो त्या महिला येऊन भेटतात. त्यात त्या रश्मीवहिनी सहभागी होतात. ठाण्यात आमच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदेवर हल्ला झाला, तिथे त्या धावून गेल्या, रात्रभर तिथे पदाधिकाऱ्यांशी संपर्कात होत्या, पण त्या विधिमंडळ राजकारणात येतील असं मला वाटत नाही असं त्यांनी सांगितले. पाहा संजय राऊतांची पूर्ण मुलाखत
तर आदित्य ठाकरे निर्भीड आहेत. आजोबा बाळासाहेबांचे गुण त्यांच्यात आहेत. संकटकाळात ज्याप्रकारे नेतृत्व उभे केले आहे. लोकं त्यांच्यावर फिदा आहेत. आम्ही आता सिनिअर सिजिझन झालोय आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व करतील हे लोकांनी स्वीकारलंय, शिवसेना तरुणांची ताकद आहे. आदित्य ठाकरे ज्याप्रकारे काम करतायेत ते नुसते पक्षाचे काम करताय असं नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. लोकं त्यांचे बोलणे स्वीकारतायेत. आदित्य ठाकरेंचे नेतृत्व लोकांना कमालीचे आवडू लागले आहेत असं कौतुक संजय राऊतांनी केले. लोकमत ऑनलाईननं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
उद्धव ठाकरेंचे एक मोठे प्रस्थ
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत, काँग्रेसचे नेतृत्व दिल्लीत आहे आणि महाराष्ट्रात शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. आपल्याला हुकुमशाहीविरोधात लढले पाहिजे हे तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी निर्णय घेतला आहे. ही भूमिका सगळ्यांनी एकत्र बसून घेतलीय. उद्धव ठाकरे यांचे प्रस्थ आहे. आमच्याकडून शिवसेना काढून घेतली, चिन्ह काढले तरी आमचे प्रस्थ आहे. आता आमच्याबद्दल राष्ट्रवादीत काय चर्चा होते हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. महाविकास आघाडी अखंड राहील हेच मी बोलतोय असंही राऊतांनी सांगितले.