आनंदधारा... जोरदार मान्सून सरी करणार चिंब; राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 06:59 AM2023-07-15T06:59:41+5:302023-07-15T06:59:59+5:30
राज्यात शनिवारपासून पुन्हा पावसाचे प्रमाण वाढणार असून, पुढील ३ दिवस राज्यात ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल,
मुंबई : गुजरात ते केरळ किनारपट्टीच्या दरम्यान हवामानात होत असलेले बदल, दक्षिणेकडे सरकलेला मान्सूनचा पूर्व - पश्चिम मुख्य आस, दक्षिण उत्तर प्रदेशातील फतेहपूरपासून गुजरातपर्यंत पसरलेला मान्सूनचा आस आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीय वारे अशा घटकांमुळे मुंबई व राज्यातील काही भागांत पुन्हा मान्सून सक्रिय झाला असून शुक्रवारी काही ठिकाणी चांगला पाऊस झाला.
राज्यात शनिवारपासून पुन्हा पावसाचे प्रमाण वाढणार असून, पुढील ३ दिवस राज्यात ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. १४ ते १७ जुलैच्या दरम्यान कोकण, विदर्भातील काही भाग आणि घाट परिसरात इशारा देण्यात आला आहे.
कुठे, कोणता इशारा?
१५ व १७ ते २१ जुलै : मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार
१४ ते १६ जुलै : विदर्भात मुसळधार, १७ जुलैपासून जोरदार
१५ जुलै : मध्य महाराष्ट्रात मध्यम, १६ ते १९ जुलै मुसळधार
मुंबईसह कोकणात जोरदार सुरू असलेला पाऊस कायम राहणार आहे. कोकणाबरोबरच खान्देश ते सोलापूरपर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांत पावसाची शक्यता वाढली आहे. - माणिकराव खुळे, माजी हवामान अधिकारी
दिल्लीत राजघाट परिसरातही पाणी
गुरुवारी ऐतिहासिक पातळी गाठून राजधानी दिल्लीला वेठीस धरणाऱ्या यमुनेच्या पुराने शुक्रवारी काहीशी उसंत घेतली. पण, धोक्याच्या पातळीपेक्षा तीन मीटरने वर असलेल्या पुरामुळे जलमय झालेल्या दिल्लीतील पाणी काही ओसरले नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची निवासस्थाने असलेल्या सिव्हिल लाइन्स भागात कंबरेपर्यंत पाणी साचले. यमुनेच्या काठावरील राजघाट, मॉनेस्ट्री मार्केट, यमुना बाजार, इंदिरा गांधी स्टेडियम, मजनू का टिला, यमुना खादर, आयटीओ, काश्मिरी गेट, निगमबोध घाट, यमुना बँक मेट्रो स्थानकाला पुराची झळ बसली.