राज्यातील मंदिरं १ नोव्हेंबरपर्यंत खुली करा, अन्यथा...; भाजपचा ठाकरे सरकारला स्पष्ट इशारा
By कुणाल गवाणकर | Published: October 28, 2020 01:27 PM2020-10-28T13:27:15+5:302020-10-28T13:33:56+5:30
भाजप अध्यात्मिक आघाडीची आक्रमक भूमिका; राज्यपाल कोश्यारींची घेतली भेट
मुंबई: राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. मंदिरं उघडण्याची मागणी करणारं पत्र त्यांनी राज्यपालांना दिलं. ठाकरे सरकारनं १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरं खुली करण्याचा निर्णय न घेतल्यास मंदिरांची टाळी फोडू, असा स्पष्ट इशारा भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसलेंनी राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरे सरकारला दिला आहे.
सरसंघचालक 'तसं' कधीच सांगणार नाहीत; शिवसेनेचा भाजपवर पुन्हा बाण
राज्यातील मंदिरं गेल्या ७ महिन्यांपासून बंद आहेत. इतर सर्व गोष्टी सुरू करण्यात आल्या असताना मंदिरं मात्र बंद ठेवली गेली आहेत. मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी याआधी आम्ही राज्यभर घंटानाद आंदोलन केलं. मात्र ठाकरे सरकारनं त्याची दखल घेतली नाही. आता सरकारनं १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरं खुली करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा मंदिरांची टाळी फोडू, अशी भूमिका भोसलेंनी मांडली.
'दसरा मेळाव्यात भारताचा अपमान केला'; उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
काही दिवसांपूर्वी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळ दिली गेली नाही. त्यानंतर अध्यात्मित आघाडीनं सरकारला दसऱ्यापर्यंतची मुदत दिली. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आघाडीकडून देण्यात आला. मात्र ठाकरे सरकारनं मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला आहे.
“महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज राहा”; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश
मंदिर खुली करण्यावरून राज्यपाल वि. मुख्यमंत्री सामना
दोनच आठवड्यांपूर्वी मंदिरं खुली करण्याच्या विषयावरून राज्यपाल कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. ‘तुम्ही कट्टर हिंदुत्त्ववादी आहात. प्रभू श्रीरामांप्रती तुमची श्रद्धा तुम्ही जाहीरपूर्वक दाखवली होती. राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शनही घेतलं होतं. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरालाही तुम्ही भेट दिली होती. मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या 'सेक्युलर' शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो 'सेक्युलर' शब्द तुम्ही स्वीकारला आहे, असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला होता.
माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही!
माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला उत्तर दिले. तसेच महाराष्ट्राला अथवा राज्याच्या राजधानीला, पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत-खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा सणसणीत टोलाही ठाकरे यांनी लगावला.