अभिजीत बिचुकले विरोधातील तक्रार मागे घेणार, गुरूवारी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 02:02 PM2019-06-25T14:02:23+5:302019-06-25T14:04:36+5:30
खंडणीची मागणी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अभिजीत बिचुकले याच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदार फिरोज पठाण यांनी सोमवारी न्यायालयात अर्ज दिला आहे. त्या अर्जावर तसेच बिचुकले याच्या जामीनावर गुरुवार दि. २७ रोजी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सातारा : खंडणीची मागणी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अभिजीत बिचुकले याच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदार फिरोज पठाण यांनी सोमवारी न्यायालयात अर्ज दिला आहे. त्या अर्जावर तसेच बिचुकले याच्या जामीनावर गुरुवार दि. २७ रोजी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मराठी बिग बॉस सिझन २ मधील कलाकर अभिजीत बिचुकले याला चेक बाऊन्स प्रकरणी सातारा पोलिसांनी दि. २१ रोजी मुंबई येथून अटक केली. या प्रकरणात त्याला दुस-याच दिवशी ( दि. २२ ) न्यायालयानेजामीन मंजूर केला. दरम्यान, सन २०१२ मध्ये बिचुकले याने फिरोज पठाण यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याचा गुन्हा दाखल होता.
त्यासाठी सातारा शहर पोलिसांनी न्यायालयाकडे बिचुकले याचा ताबा मागितला. न्यायालयाने परवानगी देताच बिचुकले याला पोलिसांनी अटक केली. न्यायलयाने त्याला २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे बिचुकले याची रवानगी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात केली.
दरम्यान, खंडणी प्रकरणातील तक्रारदार फिरोज पठाण यांनी खंडणीसंदर्भातील तक्रार मागे घेण्याबाबत सोमवारी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज सादर केला. या अर्जावर आणि बिचुकले याच्याही जामीनाच्या अर्जावर आता गुरूवारी सुनावणी होणार आहे. त्यानंतरच बिचुकले कारागृहातून बाहेर येणार का आणि मग बिग बॉसच्या घरात जाणार का या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.