...तर पद्म पुरस्कार सरकारला परत करणार; अण्णा हजारे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 06:09 PM2019-02-03T18:09:27+5:302019-02-03T18:09:52+5:30
अण्णा हजारे यांची आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी भेट घेतली. यानंतर अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषद घेतली.
राळेगण सिद्धी : लोकपाल कायद्यासाठी समाजसेवक अण्णा हजारे हे गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. पंतप्रधान मोदी यांचे शुभेच्छांचे पत्र, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पैसे घेतल्याचा केलेला आरोप यावरून उद्विग्न झालेल्या अण्णा यांनी सरकारला 8 फेब्रुवारीची मुदत दिलेली आहे. अन्यथा 8 किंवा 9 तारखेला पद्मभूषण पुरस्कार परत करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
अण्णा हजारे यांची आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी भेट घेतली. यानंतर अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकार कडून मिळणाऱ्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करताना, ज्या कामासाठी आपल्याला हा पुरस्कार देऊ केला, तेच काम करणे सरकारला पटत नसेल तर हा पुरस्कार आपण मागे देणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, राज्य सरकारच्यावतीने अण्णांची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन राळेगणसिद्धीत आले होते. यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले की, ज्येष्ठ समाजसेवर अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत.
केंद्र सरकारच्या अखत्यारित येणा-या मागण्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. लवकरत त्याही मागण्या मान्य होतील. तसेच, अण्णांचे वय जास्त असल्यामुळे उपोषण सोडणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन उपोषण सोडण्याची विनंती अण्णांना करावी, असे आवाहन महाजन यांनी यावेळी ग्रामस्थांना केले.