कॅन्टोन्मेंटचे प्रश्न मार्गी लावणार
By admin | Published: July 21, 2016 02:03 AM2016-07-21T02:03:33+5:302016-07-21T02:03:33+5:30
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात देहूरोड, खडकी, नाशिक, औरंगाबाद या भागातील सदस्यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट
पिंपरी : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात देहूरोड, खडकी, नाशिक, औरंगाबाद या भागातील सदस्यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. संरक्षणमंत्र्यांशी कॅन्टॉन्मेंटच्या प्रश्नावर चर्चा झाली, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
कॅन्टोन्मेंट बोर्डाशी निगडित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लागावे म्हणून खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखाली संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची दिल्लीतील साऊथ ब्लॉकमधील त्यांच्या कार्यालयामध्ये देहूरोड, खडकी, नाशिक, औरंगाबाद येथील सदस्यांसमवेत भेट घेतली. या प्रसंगी खासदार हेमंत गोडसे, खासदार गोपाळ तुमाणे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डच्या उपाध्यक्षा अरुणा पिंजण, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष सुरेश कांबळे, राहुल बालघरे, रघुवीर शेलार, सारिका नाईकनवरे, अमोल नाईकनवरे, हाजीमलंग मारुमुथ्थू, गोपाळ तंतरपाळे, विशाल खंडेलवाल आदी उपस्थित होते.
देशामध्ये एकूण ६२ कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. त्यातील सात महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामधील पुणे, खडकी, देहूरोड हे तीन कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे जिल्ह्यामध्ये येतात. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या विविध समस्या या बैठकीमध्ये मांडल्या. यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्व्हिस चार्जची कोट्यवधी रुपयांची रक्कम केंद्राकडे प्रलंबित असून, ती जर केंद्राने कॅन्टोन्मेंटला दिली तर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरी विकास कामाला चालना मिळेल. तसेच केंद्र शासनाच्या विविध योजना या नगरपालिका व महानगरपालिका यांना लागू केल्या जातात त्या योजनांमध्ये बोर्डचा सहभाग करण्यात यावा. जेणेकरून बोर्ड हद्दीतील नागरिकांना याचा लाभ होईल. जिल्हा नियोजन समितीवर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या एका सदस्याला स्थान मिळावे, कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील बांधकाम नियमावली ही जुनी आहे.
(प्रतिनिधी)
>बोपखेल येथून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत होणारा नवीन रस्ता तत्काळ करण्याबाबत महापालिकेला सूचना कराव्यात. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील बोपखेल गावाकडून येणारा रस्ता पूर्णत: महानगरपालिकेने करावा. जवळपास पाऊण तास चाललेल्या या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी महाराष्ट्रातील कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
- श्रीरंग बारणे, खासदार