सलमान तुरूंगात जाणार की बाहेर राहणार? फैसला 6 मे रोजी
By Admin | Published: April 21, 2015 01:53 PM2015-04-21T13:53:04+5:302015-04-21T13:53:20+5:30
सलमान विरोधातील हिट अँड रन खटल्याचा अंतिम निकाल 6 तारखेला लागणार असून तुरूंगात जाणार की त्याला दिलासा मिळणार हेही स्पष्ट होईल.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - बॉलिवूडचा 'दबंग' स्टार सलमान खान तुरूंगात जाणार की त्याला दिलासा मिळणार याचा फैसला येत्या 6 मे रोजी होणार आहे. सलमान विरोधातील हिट अँड रन खटल्याचा अंतिम निकाल 6 तारखेला लागणार असल्याचे मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केले असून याप्रकरणी सलमान दोषी आढळल्यास त्याला 10 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.
28 सप्टेंबर 2002 रोजी सलमान खानच्या लँड क्रूझर या गाडीने वांद्र्यातील हिल रोडवरील अमेरिकन एक्स्प्रेस बेकरीनजीकच्या फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले. या अपघातात एक जण ठार झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. अपघातावेळी सलमान गाडी चालवत होता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते, मात्र सलमानने ते वृत्त फेटाळले. अपघातस्थळावरून पळून गेल्यामुळे पोलिसांनी सलमानला अटक करत त्याच्यावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला. तसेच त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. या प्रकरणी आत्तापर्यंत 17 साक्षीदारांची जबानी नोंदवण्यात आली आहे. अपघातावेळी दारू प्यायलेली असल्याने आपण सलमानला रॅश ड्रायव्हिंग न करण्याचा सल्ला दिला होता, असा दावा या खटल्यातील महत्वाचा साक्षीदार आणि सलमान खानचा माजी सुरक्षारक्षक रविंद्र पाटीलने केला होता. . मात्र काही काळानंतर रविंद्रने त्याची साक्ष बदलत अपघातावेळी सलमानने दारू प्यायली होती की नाही याबद्दल आपण साशंक असल्याचे म्हटले होते. नंतर रविंद्रचा टीबीमुले मृत्यू झाला. तर अपघातावेळी सलमान नव्हे तर आपण गाडी चालवत होतो, अशी कबुली सलमानचा ड्रायव्हर अशोक सिंग याने दिल्याने या खटल्याला नवीन वळण मिळाले. तसेच गाडीचे टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला असेही ड्रायव्हरने सांगितले.