यार्डातच थांबलेली एसी लोकल चर्चगेटहूनच सुटणार?
By admin | Published: January 4, 2017 01:44 AM2017-01-04T01:44:27+5:302017-01-04T01:44:27+5:30
सात महिन्यांपूर्वी मुंबईत दाखल झालेली एसी लोकल पश्चिम रेल्वेमार्गावर धावण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. एसी लोकलच्या जास्त असलेल्या उंचीमुळे मध्य रेल्वेने
मुंबई : सात महिन्यांपूर्वी मुंबईत दाखल झालेली एसी लोकल पश्चिम रेल्वेमार्गावर धावण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. एसी लोकलच्या जास्त असलेल्या उंचीमुळे मध्य रेल्वेने एसी लोकल चालवण्यास नकार दिल्यानंतर पश्चिम रेल्वेकडून ही लोकल चालवण्यासाठी चाचपणी केली जात होती. मात्र एसी लोकलच्या जादा उंचीमुळे चर्चगेट ते वांद्रेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात येत होते. या तांत्रिक अडचणी सोडवणे शक्य असून, एसी लोकल चर्चगेटहूनच चालवली जाऊ शकते, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी याबाबतचा अंतिम निर्णय पश्चिम रेल्वे मुख्यालयाकडूनच घेतला जाईल.
रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार पश्चिम रेल्वेने याची चाचपणी करण्यास सुरुवात केली. चर्चगेट ते वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेप्रमाणेच अडचणी येत असल्याने त्या सोडविण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्याचा अहवालही पश्चिम रेल्वे विभागीय व्यवस्थापकांकडून मुख्यालयाकडे पाठविण्यात आला.
जैन यांनी सांगितले की, चर्चगेट ते वांद्रेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी आहेत. यात माहीम व माटुंगा येथे कमी उंचीच्या पुलाची तर महालक्ष्मी येथे ओव्हरहेड वायरची अडचण आहे. माहीम व माटुंगा येथील दोन्ही पूल तोडण्यात येणार असून, ते नव्याने बांधण्यात येतील. त्याचप्रमाणे महालक्ष्मी आणि परिसरात ओव्हरहेड वायरचीही कमी उंची आहे. त्या ठिकाणी रेल्वे रूळ खाली करून किंवा ओव्हरहेड वायर वर करून ही समस्या सोडवू शकतो. महालक्ष्मीपर्यंत अशा प्रकारच्या सहा समस्या आहेत आणि तेही सोडवून एसी लोकल चर्चगेटपासून चालवणे शक्य आहे. परंतु याबाबत पश्चिम रेल्वे मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून,
अंतिम निर्णय त्यांच्याकडूनच घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)