भस्म लावले असते तर प्रमोद महाजन वाचले असते - चंद्रकांत खैरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 06:09 PM2019-02-23T18:09:24+5:302019-02-23T20:28:29+5:30
औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. औरंगाबादमध्ये आयोजित आरोग्य मेळाव्यात चंद्रकांत खैरे यांनी भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याबद्दल अजब दावा केला आहे.
औरंगाबाद : औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. औरंगाबादमध्ये आयोजित आरोग्य मेळाव्यात चंद्रकांत खैरे यांनी भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याबद्दल अजब दावा केला आहे.
प्रमोद महाजन अत्यवस्थ असताना आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले नाही. नाहीतर, प्रमोद महाजन यांच्या नाडीवर भस्म लावून जप करून त्यांना वाचविले असते, असा खळबळजनक आणि हास्यास्पद दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. प्रमोदजी जेव्हा रूग्णालयात होते तेव्हा मला गोपीनाथ मुंडे म्हटले होते तू काहीतरी कर. सिद्धिविनायक मंदिरात जा काहीतरी फूल वगैरे घेऊन ये. माझ्याकडे एक पुडी होती. तो अंबाबाईचा अंगारा होता, तो मी राहुलकडे दिला. राहुलला सांगितलं प्रमोदजींच्या उशीखाली ही पुडी ठेव. प्रमोद महाजन यांच्या उशीखाली ती पुडी ठेवल्यावर मी तिथे गेलो होतो मी जप केला. पण मला त्यावेळी प्रमोद महाजनांना हात लावता आला नाही. तिथे जाण्याची कुणाला संमतीच नव्हती. ती मिळाली असती तर मी महाजनांना वाचवू शकलो असतो असा दावा खैरे यांनी केला आहे. प्रमोदजी बारा दिवस जगले, त्यानंतर शांत झाले. त्याच एका कामात मला अपयश आलं नाहीतर मला आत्तापर्यंत अशा प्रयोगांमध्ये एकदाही अपयश आलेलं नाही. जशी डॉक्टरांची शक्ती असते तशी आमची सदिच्छा असते. मी अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगत नाही, खरोखरच सांगतो आहे, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी हा दावा कोणत्या निवडणुकीच्या प्रचार सभेत केला नाही. तर चक्क राज्य सरकारच्या आरोग्य मेळाव्यात केला आहे. या मेळाव्यात अनेक डॉक्टर उपस्थित होते. त्यांच्यासमोर चंद्रकांत खैरे यांनी असे बेजबाबदार विधान केले आहे.