शरद पवार एक जागा भाजपला सोडणार? एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 08:26 AM2024-03-14T08:26:25+5:302024-03-14T08:27:52+5:30
Maharashtra Politics: सुनेला उमेदवारी, सासरा-नणंद रणनिती ठरविण्यात गुंतले... मोठा पेच, एकीकडे मविआ दुसरीकडे विरोधी पक्षाची घरातच उमेदवारी...
एकीकडे भाजपाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला लोकसभेचे तिकीट दिलेले असताना दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील द्विधा मनस्थितीची परिस्थिती आहे. शरद पवारांना एक जागा भाजपाला अशीच सोडून द्यावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता शरद पवार कमी ताकदीचा उमेदवार देऊन ही जागा भाजपाला सोडतात की मविआचा तगडा उमेदवार देतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपाने रावेर लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपात जाण्याची चर्चा सुरु होती. खुद्द रक्षा खडसे यांनीच सासऱ्यांनी भाजपात परत यावे, असे आवाहन केले होते. परंतु खडसे यांची भाजपविरोधातील वक्तव्ये पाहता रक्षा खडसे यांना भाजपा पुन्हा तिकीट देते का, असाही प्रश्न उपस्थित होत होता. परंतु आता चित्र स्पष्ट झालेले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदार, खासदारांचा मोठा लवाजमा सोबत नेला तरी खासदार कलाबेन डेलकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडली नव्हती. परंतु त्या काहीही न जाहीर करताच पुन्हा भाजपात गेल्या आहेत. भाजपाने त्यांना उमेदवारी जाहीर करून आश्चर्याचा धक्का दिला आहे. तसाच प्रकार शरद पवारांच्या गोटात झाला आहे. पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या सुनेला उमेदवारी देऊन भाजपाने रावेर मतदारसंघात मविआसमोर पेच निर्माण केला आहे. आता भाजपविरोधात लढायचे की ती जागा कमी क्षमतेचा उमेदवार देऊन सोडायची या द्विधा मनस्थितीत शरद पवार गट असणार आहे. बारामतीत सासरा वि. सुन अशी अस्तित्वाची लढत पवारांमध्ये असली तर खडसेंच्या कुटुंबात तेवढे वैर आलेले नाहीय. राजकारणातील एक सोय म्हणून रक्षा खडसे खासदार म्हणून भाजपात राहिल्या होता. तर एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले होते.
रक्षा खडसे यांना तिकीट जाहीर होताच नाशिक दौऱ्यावर असलेल्या शरद पवार, एकनाथ खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत काय मुद्दे आले हे समजू शकले नाही. परंतु, रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी दिल्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक झाल्याचे समजते. आता रक्षा खडसे यांना एकनाथ खडसे छुपा पाठिंबा देतात की त्यांच्याविरोधात प्रचार करतात यावरून राज्यातील राजकारण रंगणार आहे.
दरम्यान, रक्षा यांना उमेदवारी जाहीर होताच मुक्ताईनगर पिंपळगाव भुसावळ विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवत आनंद व्यक्त केला. हे सर्व एकनाथ खडसे यांचेच कार्यकर्ते आहेत. यामुळे मविआला एका जागा अशीच सोडावी लागण्याची शक्यता आहे. आता इतर पक्ष यासाठी तयार होतात का? की तगडा उमेदवार देतात की एकनाथ खडसेंनाचा उमेदवारी देतात, यावर पुढील राजकारण अवलंबून आहे.