शिवसेना, NCPमधील फुटीमुळे BJPला फायदा होईल का? सर्वेतून समोर आली धक्कादायक आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 07:44 PM2023-08-24T19:44:10+5:302023-08-24T19:45:31+5:30
Maharashtra Political Update: महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपावर चौफेर टीका होत असते. मात्र आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीचा भाजपाला फायदा होईल का, असा प्रश्न विचारला असता सर्व्हेमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये ठरावीक अंतराने नवनवे अंक समोर येत आहेत. मुख्यमंत्रिपदावर दावेदारी करत उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला अडीच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार चालवल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडाचा फायदा घेत भाजपाने पुन्हा एकदा राज्यात आपली सत्ता आणली होती. त्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत अजित पवार यांनाही भाजपाने युती सरकारमध्ये सामावून घेतले होते. दरम्यान, या फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपावर चौफेर टीका होत असते. मात्र आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा भाजपाला फायदा होईल का, असा प्रश्न विचारला असता सर्व्हेमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
इंडिया टुडे आणि सी वोटर यांनी देशाचा कल जाणून घेण्यासाठी केलेल्या एका व्यापक सर्वेमध्ये विरोधी पक्षांमध्ये पडलेल्या फुटीमुळे महाराष्ट्रात भाजपाला फायदा होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना तब्बल ६० टक्के लोकांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे भाजपाला फायदा होईल, असं म्हटलं आहे. तर २५ टक्के लोकांनी या फुटीचा भाजपाला काहीही फायदा होणार नाही, असं म्हटलं आहे. तर १५ टक्के लोकांनी काही सांगता येणार नाही, असं मत मांडलं आहे.
याच सर्वेमध्ये भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय का? असा प्रश्न विचारण्यात आला असता तब्बल ४५ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे. तर ३८ टक्के लोकांनी तसा दुरुपयो हा सर्वच पक्ष करतात, असं उत्तर दिलं आहे.
इंडिया टुडे आणि सी वोटरने हा सर्वे १५ जुलै ते १४ ऑगस्टदरम्यान देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये केला आहे. त्यामध्ये एकूण २५ हजार ९५१ जणांचा कल जाणून घेण्यात आला आहे.