केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेना बहिष्कार टाकणार ?
By Admin | Published: July 4, 2016 05:04 PM2016-07-04T17:04:38+5:302016-07-04T17:33:50+5:30
द्या सकाळी दिल्लीत होणा-या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिवसेनेचे खासदार बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - उद्या सकाळी दिल्लीत होणा-या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिवसेनेचे खासदार बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तारावर अद्यापपर्यंत शिवसेनेला विश्वासात घेऊन कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही.
त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी असल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून रिपाईचे रामदास आठवले आणि धुळयाचे भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे यांना संधी मिळू शकते.
आपण लाचारी पत्करणार नाही असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सत्तेत समाधानकारक वाटा न मिळाल्यामुळे शिवसेनेने वारंवार सामनाच्या अग्रलेखातून भाजपला लक्ष्य करुन आपली खदखद व्यक्त केली आहे.
केंद्रात शिवसेनेकडे अनंत गिते यांच्या रुपाने अवघे एक केंद्रीय मंत्रिपद आहे. अनंत गिते केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे मंत्री आहेत. महाराष्ट्रातही शिवसेनेला महत्वाच्या खात्यांपासून वंचित ठेऊन दुय्यम महत्वाची खाती देण्यात आली आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसह त्यांचे नेते जाहीरमंचावरुन आपल्या मुखपत्रातून नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत असतात.