शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा, ठाकरी शैलीत उद्धव भाजपावर गरजणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 08:47 PM2017-09-29T20:47:45+5:302017-09-29T20:48:23+5:30
दरवर्षीप्रमाणे शस्त्र पूजा आणि रावण दहनाचा कार्यक्रम होणार असल्याचे शिवसेनेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील.
मुंबई - शिवसेनेचा दसरा मेळावा दर वर्षीप्रमाणे यंदाही उद्या (ता. 29) शिवाजी पार्कवर होणार आहे. सायंकाळी सहा वाजता उद्धव ठाकरेसह शिवसेना नेत्यांचे आगमान होणार आहे. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे शस्त्र पूजा आणि रावण दहनाचा कार्यक्रम होणार असल्याचे शिवसेनेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. तसेच आजच्या रेल्वे दुर्घटनेवरुन केंद्र आणि राज्य सरकारविरोधात तोफ डागण्याची शक्यता आहे.
सत्तेत आल्यापासून शिवसेनेनं भाजपावर टीका केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेनं महागाईवरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे. सत्तेत असूनही शिवसेना आणि भाजपा काही कारणामुळे सतत कोणत्याही ना कोणत्या गोष्टीवरुन एकमेंकासमोर उभे ठाकलेले असतात. गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या सर्व आमदारांनी सत्तेतून बाहेर पडण्यासाठी विरोध दर्शवला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सतेत राहण्याचा निर्णय कायम ठेवला होता.
उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजपावर महागाई, शुक्रवारची रेल्वे दुर्घटना, लोकलचे अव्यवस्थापन, बुलेट ट्रेन, नारायण राणे आणि मंत्रीमंडळ विस्तार या मुद्यावरुन गरजण्याची शक्यता आहे.
सत्तेतून बाहेर पडणार का?
शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, अशी शिवसैनिक, पक्षाचे जिल्ह्याजिल्ह्यातील लहानमोठे पदाधिकारी यांची इच्छा आहे. तथापि, पक्षाचे मंत्री, आमदार हे सत्तेतून बाहेर पडण्यास तयार नसल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमके कोणाचा आवाज ऐकून निर्णय देतात, हा औत्सुक्याचा विषय आहे.
सरकारमधून बाहेर पडण्याबाबत ठाकरे यांनी अद्याप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी एकत्रितपणे चर्चा केलेली नाही. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर पक्षाची भूमिका दसरा मेळाव्यात मांडायची असेल तर मेळाव्याच्या दोन तास आधी आमच्याशी चर्चा केली जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ही परंपरा आहे. त्यानुसार गरज भासल्यास उद्धव ठाकरे हे उद्या काही जणांशी चर्चा करतील, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी देवेंद्र फडणवीस सरकारला धोका नसल्याचा दावा भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने लोकमतशी बोलताना केला.