शिवसृष्टी होणार की रखडणार?

By admin | Published: May 14, 2017 12:41 AM2017-05-14T00:41:57+5:302017-05-14T00:41:57+5:30

पुणे मेट्रो प्रकल्पाला चालना मिळाली; पण त्याच्याही आधी म्हणजे, सन २०१० पासून चर्चेत असलेली शिवसृष्टी मात्र अजूनही कागदावरच आहे

Will Shivsarshi happen to keep that? | शिवसृष्टी होणार की रखडणार?

शिवसृष्टी होणार की रखडणार?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रखडलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाला चालना मिळाली; पण त्याच्याही आधी म्हणजे, सन २०१० पासून चर्चेत असलेली शिवसृष्टी मात्र अजूनही कागदावरच आहे. महापालिका तेव्हापासून त्यासाठी अंदाजपत्रकात कधी ३० कोटी, तर कधी १० कोटी, अशी तरतूद करीत आहे. वर्षाअखेरीस ही तरतूद दुसऱ्या कामांवर वर्ग करून घेतली जाते. याही वर्षीच्या अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, बहुचर्चित पुणे मेट्रोने त्याच जागेवर मेट्रो स्टेशन प्रस्तावित केल्यामुळे, या नियोजित शिवसृष्टीपुढे प्रश्नचिन्ह लागले आहे.
छत्रपती शिवाजीमहाराजांची जन्मभूमी व सुरुवातीचा बराच काळ कर्मभूमी असलेल्या पुणे जिल्ह्यात व शहरातही नाव घ्यावे, असे त्यांचे एकही स्मारक नाही. महापालिकेतील काही नगरसेवकांना याची खंत वाटून त्यांनी सन २०१०मध्ये खास ठराव करून शिवसृष्टी प्रस्तावित केली. तत्कालीन उपमहापौर दीपक मानकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. कोथरूड येथील जुन्या बंद पडलेल्या कचरा डेपोची सुमारे २८ एकर जागा या प्रकल्पासाठी ठरविण्यात आली. महापालिकने प्रयत्न करून, या जागेचा आरक्षण हेतू बदलून घेतला.
शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे आदी नगरसेवकांनी या शिवसृष्टी प्रकल्पाचा बराच पाठपुरावा केला. मानकर यांनी त्या वेळी ठराव करून ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली. त्यांनी या कामाचे महत्त्व ओळखून त्याचे कल्पक डिझाइनही तयार केले. त्याचे सादरीकरणही महापालिकेत करण्यात आले. महाराजांच्या जन्मापासून ते अखेरपर्यंतचा कालखंड यात उभा करण्याची कल्पना आहे. पुण्याची एक नवी ओळख निर्माण होईल, अशा पद्धतीची रचना या शिवसृष्टीत केली असून, एक चांगले प्रेरणा देणारे स्थळ होईल, असा प्रयत्न करण्यात आला आहे.
दरम्यानच्या काळात पुण्यात मेट्रो प्रकल्पाचा बोलबाला सुरू झाला व या प्रकल्पावर संक्रात आली. ज्या जागेवर शिवसृष्टी होणार होती तिथेच मेट्रोचे नियोजन स्टेशन आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे डिझाइन करणाऱ्या दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने एक तर स्टेशन तरी किंवा शिवसृष्टी तरी, असे महापालिकेला कळविले. तेव्हापासून हा विषय भिजत घोंगडे होऊन पडला आहे. महापालिका त्यावर काहीही निर्णय घ्यायला तयार नाही व मेट्रो प्रकल्पाचे काम आता सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यावर आले आहे. ‘वनाज ते रामवाडी’ या मार्गाची निविदाही लवकरच जाहीर होत आहे. महापालिकेने काहीही न कळविल्यामुळे मेट्रो स्टेशन शिवसृष्टीच्या नियोजित जागेवरच होणार, हे आता जवळपास पक्के झाल्यात जमा आहे.
असे असताना यावर्षीच्या अंदाजपत्रकात शिवसृष्टीसाठी म्हणून पुन्हा १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ कोथरूडचेच आहेत.
मेट्रो स्टेशनच्या जवळ शिवसृष्टी असेल, तर मेट्रोला प्रवासी मिळतील, असे मोहोळ महामेट्रोला पटवून देतील, असा विश्वास मानकर यांनी व्यक्त केला.
जागेच्या विभागणीला प्रतिसाद नाही
मानकर, सुतार, शिंदे यांनी मध्यंतरी महापालिकेला २८ एकर जागेपैकी १८ एकर जागेवर शिवसृष्टी व १० एकर जागेवर मेट्रो स्टेशन, असा पर्याय दिला. त्याआधी त्यांनी स्टेशन भूमिगत व त्याच्यावर शिवसृष्टी, असाही पर्याय दिला होता; मात्र स्टेशनवरच राहणार असल्याने तो मागे पडला. आता त्यांचे म्हणणे जागेची विभागणी करा व दोन्ही प्रकल्प करा, असे आहे. या पर्यायाला प्रतिसाद मिळाला नाही, याबद्दल मानकर यांनी खंत व्यक्त केली.
महापालिकेच्या बोधचिन्हात शिवाजीमहाराज आहेत, सभागृहातील सर्वपक्षीय नगरसेवक वारंवार महाराजांचे नाव घेत असतात; पण त्यांच्या नावे प्रेरणा मिळेल, असे स्मारक उभे करण्यासाठी मात्र कोणी पाठिंबा द्यायला तयार नाही, असे ते म्हणाले. प्रशासनानेही या प्रस्तावाचा काहीही विचार केलेला नाही.
अंदाजपत्रकात तरतूद केली आहे, याचाच अर्थ आम्हाला हा प्रकल्प करायचा आहे. जागेच्या बाबतीत अडचण झाली आहे; मात्र चर्चेनंतर ती सुटू शकेल. मागील सत्ताधाऱ्यांनी यावर काहीही केले नाही. आमच्याकडून तसे होणार नाही. पुण्यात शिवसृष्टी व्हावी, याबाबत आम्ही आग्रही आहोत. पक्षभेद विसरून त्यासाठी प्रयत्न करू.
- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते, महापालिका
यावर्षी कोणत्याही स्थितीत अंदाजपत्रकातील शिवसृष्टीसाठीची १० कोटी रुपयांची तरतूद वर्गीकरण होऊ देणार नाही. त्यासाठी आंदोलन करावे लागले, न्यायालयात जावे लागले, तरी त्याची तयारी आहे.
- दीपक मानकर, माजी उपमहापौर, नगरसेवक

Web Title: Will Shivsarshi happen to keep that?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.