एक्स्प्रेस-वेच्या सुरक्षेचे काम त्वरित करणार - शिंदे
By admin | Published: August 3, 2015 01:09 AM2015-08-03T01:09:45+5:302015-08-03T01:40:45+5:30
पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर खंडाळा बोरघाटात खंडाळा बोगद्याजवळ शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या दरडीची तसेच घटनास्थळावर सद्यपरिस्थितीची
खालापूर : पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर खंडाळा बोरघाटात खंडाळा बोगद्याजवळ शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या दरडीची तसेच घटनास्थळावर सद्यपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी या घटनास्थळी भेट दिली.
सहकार मंत्री चंद्रकांत पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील उपस्थित तंत्रज्ञांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला. या वेळी शिंदे यांनी या मार्गाला आता १५ वर्षे झाली असून, येथील पावसाळी वातावरणामुळे दगडांची झीज होऊन ते सुटे झाले असल्याचे सांगितले. तसेच त्यामुळे दरडी कोसळत असल्याची वस्तुस्थिती असून, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या संपूर्ण भागाचा भारतीय तसेच परदेशी तज्ज्ञांमार्फत जिओलॉजिकल सर्व्हे करण्यात येत आहे. हा मार्ग भविष्यात प्रवासासाठी संपूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर काम करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. खंडाळा बोरघाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. दरड कोसळल्यानंतर परदेशी तंत्रज्ञांच्या मदतीने येथे काम सुरू करण्यात आले असून, या दरडग्रस्त परिसरामध्ये
१ किलोमीटर अंतरात पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)