ST Strike: ST कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? ६ वाजता ठाकरे सरकार मोठी घोषणा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 05:16 PM2021-11-24T17:16:30+5:302021-11-24T17:16:49+5:30
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी ठाकरे सरकारमध्ये जोरात हालचाली सुरु आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी असंही पुढे आले
मुंबई - गेल्या महिनाभरापासून राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या आग्रही मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र सध्या हा निर्णय कोर्टात असल्याने विलिनीकरणावर तातडीनं निर्णय घेता येणे शक्य नाही असं राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. समिती जो अहवाल देईल त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी ठाकरे सरकारमध्ये जोरात हालचाली सुरु आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी असंही पुढे आले. त्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ करू अशी ऑफर सरकारनं कर्मचाऱ्यांना दिली. विलिनीकरण तुर्तास शक्य नाही मात्र तोवर पगारवाढीचा सुवर्णमध्ये राज्य सरकारकडून काढण्यात येत आहे. सह्याद्रीवर आज एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी बैठक घेतली होती.
या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव सरकारने कर्मचाऱ्यांकडे ठेवला आहे. पगारवाढीवर परिवहन मंत्री अनिल परब आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आजतरी तोडगा निघतो का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. जास्तीत जास्त पगारवाढ देऊन कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. ६ वाजता परिवहन मंत्री अनिल परब पत्रकार परिषद घेणार आहे त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता असल्याचं सांगितले जात आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे ती मागे घेणार असल्याचंही कळत आहे. काही कर्मचाऱ्यांवर सेवानिवृत्तीची कारवाई केली होती तीदेखील मागे घेणार आहे असंही बैठकीत ठरल्याचं कळत आहे.
ST च्या खासगीकरणाबाबतही चर्चा
एसटीच्या संपाचा फायदा उचलून खासगी बस चालविणाऱ्यांनी प्रवासी भाड्यात दुप्पटीने वाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट सुरू केली आहे. एसटी नसल्याने गैरसोय होत असल्याने प्रवाशांना खासगी बसचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघत नसल्याने सरकारने खासगीकरणाचा मुद्दा पुढे आणला होता. वाढत्या महागाईच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्याची अंमलबजावणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु, खासगीकरण करून दरवाढीचा भुर्दंड सोसण्याची वेळ आणू देऊ नका, अशी भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. एरव्ही सुरक्षित प्रवास म्हणून एसटीला विशेष प्राधान्य दिले जाते. परंतु, खासगीकरण करून सेवेत बदल होईल ती चांगल्या पद्धतीने मिळेल का? सर्वसामान्य नागरिक एसटीचा प्रवास करतो त्याप्रमाणे भाडे दर राहतील का? चांगल्या बस उपलब्ध होतील का? असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.