Maharashtra Election 2019: राज्य चालविणार की स्वयंपाक करणार?- पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 05:21 AM2019-10-13T05:21:23+5:302019-10-13T05:22:26+5:30
१० रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार खिल्ली उडवली. Maharashtra Election 2019:
बार्शी : पुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार खिल्ली उडवली. 'शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही आणि आता ते थाळी देणार आहेत. तुम्हाला राज्य चालवायचं आहे,की स्वयंपाक करायचा आहे, असा सवाल पवार यांनी शिवसेनेला केला आहे. बार्शी येथील प्रचारसभेत ते शनिवारी बोलत होते़
‘समोर कुणी पैलवानच दिसत नाही’, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर पवार म्हणाले, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या कानाकोपऱ्यात का फिरत आहेत़? हे नेते पर्यटनाला येतात की राज्य बघायला? समोर विरोधक सक्षम नसतील तर मग मुख्यमंत्र्यांना ५० सभा का घ्याव्या लागतात, असा सवाल पवार यांनी केला. आम्ही काय केले असे विचारणाऱ्यांनी शिवस्मारकाचे काय झाले, इंदू मिलचे काय झाले, याचे उत्तर द्यावे, असे पवार म्हणाले.
भाजपची टीका
इतकी वर्षे राजकारणात असलेल्या माणसाने असे करणे शोभत नाही. पराभवाच्या भीतीने ते अधिकच बिथरले आहेत, अशी टीका भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण यांनी केली.
पवारांचे ‘ते’ हातवारे
आमच्यासमोर कुस्ती लढायला कुणीच नसल्याच्या फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पवारांना केलेल्या हातवाºयांवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 'कुस्ती पैलवानांशी होते, या 'अशांशी' होत नाही!' हे वाक्य उच्चारताना पवार यांनी विशिष्ट प्रकारे हातवारे केले.