सोशल मीडियावर निर्बंध आणणारा कायदा रोखणार - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 07:14 AM2019-12-19T07:14:17+5:302019-12-19T07:14:46+5:30
नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर येईल गदा; भाजपविरोधकांना एकत्र आणणार
नागपूर : केंद्र सरकार नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर आता सोशल मीडियावर निर्बंध आणणारा कायदा करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरच गदा येणार असून, ते विधेयक रोखण्यासाठी भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पवार सध्या तीन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा करताना त्याला देशातून एवढा विरोध होईल, असे वाटले नव्हते. मात्र, केंद्राच्या या विचाराला देशभरातील तरुणांनी छेद दिला. या कायद्याच्या विरोधात निषेधाचा सूर तीव्र झाला आहे. हा सूर देशात सत्तांतर करण्यास कारणीभूत ठरेल, असे भाकीतही पवार यांनी वर्तविले.
सध्या देशातील अनेक विद्यापीठांतील तरुण नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. १९७७ साली देखील तरुणांनी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विरोधात बंड पुकारले होते. तरुणांनी उभारलेल्या त्या बंडाचा शेवट सत्तांतर करूनच झाला. त्यामुळे सध्या देशभरात तरुणांच्या मनातील बंडाचे निशाण आगामी सत्तांतराचे दिशादर्शक असेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांची महाविकास आघाडी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त गतीने स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचली आहे. आगामी निवडणुकांत तिन्ही पक्षांच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी एकत्र बसून त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर पद वाटपाची सकारात्मक बोलणी करावी, असे आपण आमदारांना कालच्या बैठकीत सांगितले. मात्र, त्यांनी आगामी अध्यक्ष, उपाध्यक्ष ठरवूनही टाकले आहेत, असे पवार यांनी गमतीने सांगितले.
गाडी योग्य दिशेने जात आहे!
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालियानवाला बाग हत्याकांडाशी केली होती. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, ‘याचा अर्थ गाडी बरोबर दिशेने जात आहे. सरकार पूर्ण पाच वर्षे टिकायला आता काही अडचण दिसत नाही,’ अशी टिप्पणी पवार यांनी केली.
भाजपचे खासदार चोरून माझे अभिनंदन करत होते!
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर इतर पक्षांचे खासदार, नेते संसद भवनात जाहीरपणे माझे अभिनंदन करत होते. मात्र, भाजपचे खासदार, मंत्री जेव्हा भेटायचे, तेव्हा ते आधी आजूबाजूला बघायचे, कोणी पाहात तर नाही ना, याची खात्री करायचे आणि मग माझा हातात हात घेऊन घट्ट दाबून अभिनंदन करायचे, असे दिलखुलास हसत आणि अॅक्शन करत शरद पवारांनी सांगितले.