परमारच्या संशयितांवर कारवाई करणारच!
By admin | Published: October 27, 2015 02:30 AM2015-10-27T02:30:56+5:302015-10-27T02:30:56+5:30
ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या राजकीय नेत्यांवर कारवाई केली जाईलच
मुंबई : ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या राजकीय नेत्यांवर कारवाई केली जाईलच. शिवाय, महापालिकेतील रॅकेटच्या सूत्रधारांनाही शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. यामुळे ठाण्यातील काही बड्या नेत्यांवरही कारवाईचे संकेत प्राप्त झाले आहे.
राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘लोकमत’च्या मुंबई कार्यालयास भेट देऊन संपादकीय मंडळाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ठाण्यातील ‘गोल्डन गँग’ला कंटाळून बांधकाम व्यावसायिक परमार यांनी केलेली आत्महत्या आणि त्यातून समोर आलेली राजकीय नावे, यावर काय करवाई करणार? असे विचारले असता ते म्हणाले, ठाणे पोलिसांना याबाबतचा न्यायवैद्यक अहवाल प्राप्त झाला आहे पोलिसांकडून कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, पोलिसांची कारवाई केवळ मर्यादीत स्वरुपाची न राहता ठाणे महापालिकेतील रॅकेटमध्ये अन्य काही नेत्यांचा सहभाग आहे किंवा कसे हे तपासून सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर कारवाई करणे हा आहे. एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचे सिद्ध झाले तर शिक्षा कमी आहे. परंतु अशा प्रकरणातील व्यापक सहभाग उघड केला गेला तर संबंधितांवर अधिक कडक कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे परमार प्रकरणात प्रत्यक्ष दोषींबरोबर सूत्रधारांच्या मुसक्या आवळण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मानले जात आहे.
(विशेष प्रतिनिधी)
—————-
चौकट -
——-
परमार यांनी लिहून ठेवलेल्या १३ पानी चिठ्ठीतून गुजरातेतील न्यायवैद्यक प्रयोगशाळेने ज्या चार नगरसेवकांची नावे मिळविली आहेत त्यात विक्रांत चव्हाण (काँग्रेस), नजीब मुल्ला आणि हनुमंत जगदाळे (दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुधाकर चव्हाण यांचा समावेश आहे. या चौघांची नावे चिठ्ठीतून जाहीर झाली तर त्याचे आपल्या कुटुंबियांना परिणाम भोगावे लागतील या भीतीतून नंतर परमार यांनी ती खोडली होती. या नगरसेवकांची नावे परमार यांनी चिठ्ठीत लिहिली एवढ्यावरून आम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. परमार यांना आत्महत्येला या चौघांनी भाग पाडले, असे सिद्ध करणारा पुरावा त्यासाठी आमच्याकडे हवा आणि यासाठी आम्ही चिठ्ठीत नावे असलेल्यांचे फोनवरील संभाषण व त्याचा तपशील बघणार आहोत, असे पोलीस उपायुक्त (झोन ५) व्ही. बी. चंदनशिवे यांनी सांगितले. चंदनशिवे म्हणाले की,‘ठाणे महानगरपालिकेने घेतलेल्या बैठकीचा (या बैठकीत नगरसेवकांनी कॉस्मॉस ग्रुपच्या प्रकल्पांविरुद्धचे प्रश्न उपस्थित केले असावेत) इतिवृत्तांत मागवणार आहोत. परमार यांचे घर आणि कार्यालयातून ताब्यात घेतलेला मोबाईल फोन आणि हार्ड डिस्क तपासणीसाठी प्रयोगशाळेत आधीच पाठविण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महापालिका स्तरावर परवानग्या मिळवताना जेवढ्या टेबलांवरून फाईल फिरते तेवढी तोंडे वाढतात हा सर्वांचाच अनुभव आहे. त्यामुळे ज्यांचे महापालिकेकडे काम आहे त्यांचा थेट मानवी संपर्क जेवढा कमी करता येईल तेवढा करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सेवाहमी कायद्यानुसार महापालिकेच्या १६ सेवा आॅनलाइन देण्याचा निर्णय झाला आहे. मुंबई महापालिकेने याबाबतची योजना तयार केली आहे. पहिल्या टप्प्यात तेथे यशस्वी अंमलबजावणी झाल्यावर अन्य महापालिकांत अंमलबजावणी केली जाईल.