रोजगार मेळावे घेणार, तिथेच नियुक्ती देणार - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 06:22 AM2022-10-23T06:22:34+5:302022-10-23T06:52:05+5:30
Devendra Fadnavis : केंद्र सरकारने एकाचवेळी ७५ हजार सरकारी नोकऱ्या शनिवारी दिल्या. त्या निमित्त रेल्वेच्या अजनी येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी २०० जणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
नागपूर : राज्य सरकारच्या वतीने यापुढे जिल्हा व तालुका पातळीवर रोजगार मेळाव्यांचे आयोजन करुन तिथेच तरुण-तरुणींना खासगी कंपन्यांमध्ये नियुक्तीची पत्रे दिली जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच येत्या वर्षभरात ७५ हजार सरकारी नोकऱ्या दिल्या जातील असेही त्यांनी जाहीर केले. केंद्र सरकारने एकाचवेळी ७५ हजार सरकारी नोकऱ्या शनिवारी दिल्या. त्या निमित्त रेल्वेच्या अजनी येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी २०० जणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
फडणवीस म्हणाले, की उद्योगांना विशिष्ट कौशल्य असलेले तरुण-तरुणी रोजगारासाठी मिळत नाहीत अशी त्यांची तक्रार आहे तर दुसरीकडे आमच्या हाताला काम नाही, अशी तरुणाईची तक्रार आहे. हे लक्षात घेता यापुढे रोजगार मेळावे घेतले जातील. विविध कंपन्यांचे मालक, अधिकारी यांना त्या ठिकाणी बोलविले जाईल. नोकरीसाठी इच्छुकांची माहिती सरकारच्या वतीने कंपन्यांना दिली जाईल. तिथेच मुलाखती होतील आणि नियुक्ती पत्रेही दिली जातील.
टीसीएस, आयबीपीएसमार्फत परीक्षा
राज्यात ७५ हजार पदे शासकीय भरती परीक्षा नामांकित कंपन्यांमार्फत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट- क व गट- ड पदभरतीच्या परीक्षा टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांमार्फत घेण्यात येणार आहेत. या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परीक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी व शर्ती सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्यामार्फत निश्चित करण्यात येणार आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रोजगाराच्या मोठ्या संधी आता उपलब्ध होत आहेत. आज एकाचवेळी ७५ हजार सरकारी नोकऱ्या
दिल्या गेल्या. पंतप्रधानांच्या या रोजगारभिमुख दृष्टिकोनाला महाराष्ट्र सरकारचीही दमदार साथ असेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.