जबाबदारी दिल्यास प्रदेशाध्यक्षपद स्वीकारणार : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:29 PM2019-06-13T12:29:30+5:302019-06-13T13:51:35+5:30
पक्षाने जबाबदारी दिल्यास कार्यकर्ता कोणतेही पद स्वीकारत असतो. प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास ती स्वीकारु, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
कोल्हापूर : पक्षाने जबाबदारी दिल्यास कार्यकर्ता कोणतेही पद स्वीकारत असतो. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास ती स्वीकारु, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले. पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती पार पाडण्यास माझी नेहमीच तयारी असते, असे सुचक वक्तव्य महसूल, कृषी व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
येथील शेंडा पार्कातील कृषी संशोधन केंद्राच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या ‘शेतकरी सन्मान भवन’ इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज, गुरुवारी सकाळी झाले. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याबाबत सूतोवाच केले.
सध्या भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात पडणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारणा केली असता, मंत्री पाटील यांनी पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती पार पाडण्यास माझी नेहमीच तयारी असते, असे सुचक वक्तव्य केले.
कागल विधानसभा लढण्याची तयारी
कागल विधानसभा लढण्याची तयारी पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व माजी आमदार संजय घाटगे या दोघांनीही सुरु केली आहे. त्याबाबत विचारले असता मंत्री पाटील म्हणाले, विधानसभेची निवडणूक या दोन घाटगेंपैकी एक जणच लढणार आहे. दोघातील कोण ? हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे घेतील.
राज्यामध्ये प्रथमच अशा स्वरूपाचे शेतकऱ्यांना सर्व सेवा एकत्र मिळण्यासाठीचे केंद्र उभारण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे उपस्थित होते. कृषी विभागाच्या विविध योजना परिणामकारकपणे राबविण्यासाठी व शेतकऱ्यांना अद्यावत कृषी तंत्रज्ञान व सुविधा एकत्र उपलब्ध होण्यासाठी शहरातील कृषी विभागाची सर्व कार्यालये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने व त्यांनी विधानसभेत दिलेल्या आश्वासनाची पूर्ती म्हणून हे भवन मंजूर झाले आहे. हे भवन कृषी संशोधन केंद्राच्या आवारातच असल्याने कार्यालयास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाकडील संशोधन पाहता येणार आहे.