तुरुंगवास पत्करेन पण माफी मागणार नाही; सुषमा अंधारेंचं थेट संस्कृत भाषेत पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 01:58 PM2023-12-23T13:58:58+5:302023-12-23T14:06:35+5:30
कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे हे माझे कर्तव्यदक्ष नागरीक म्हणून जबाबदारी आहे
मुंबई - Sushma Andhare on Neelam Gorhe ( Marathi News ) तुरुंगावास भोगेन पत्र माफी मागणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंना प्रत्युत्तर दिले आहे. विधान परिषदेत आलेल्या हक्कभंग प्रस्तावावर नीलम गोऱ्हे यांनी अंधारेंना दिलगिरी पत्र द्या अन्यथा हक्कभंगाला सामोरे जा असं म्हटलं होते. भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. त्यावर उपसभापतींनी सुषमा अंधारे यांना ८ दिवसांची मुदत देत दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले होते.त्यावर सुषमा अंधारे यांनी खोचकपणे थेट संस्कृत भाषेत पत्र लिहून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे यांनी पत्रात म्हटलंय की, मी माफी अजिबात मागणार नाही. प्रिय लोकशाही तुझ्याबद्दल मनात कायम आदेर आहे. तुझे अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई आहे.स्वातंत्र्यासाठी ज्या अविरत आणि स्वातंत्र्यवीर, वीरांगणांनी प्राणांची आहुती दिली. तितकीच कटीबद्धता स्वातंत्र्योत्तर काळातही संविधानात लोकशाहीची व्यवस्था टिकवण्यासाठी आता आमची आहे. त्याचाच भाग म्हणून संविधानाने निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे हे माझे कर्तव्यदक्ष नागरीक म्हणून जबाबदारी आहे असं मी मानते.
हिंदुत्वाची आधारशीला असणारे सर्व ग्रंथ वेद श्रुतीस्मृती पुराणे ही संस्कृतमधूनच लिहिलेली आहेत.
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) December 23, 2023
कट्टर हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्याला, आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलो असे म्हणत गद्दारीचे समर्थन करणाऱ्यांना संस्कृत यायलाच हवे. म्हणून हे पत्र संस्कृत मधून लिहिले. #माफीमागणारनाहीpic.twitter.com/kyjn1ndbJm
त्याचसोबत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सभापती पद घटनात्मक असल्याने या पदाबद्दल माझ्या मनात आदर आहे. पण आज विधिमंडळाच्या सभापती पदावरील व्यक्तीनं माझ्यावरील घटनात्मक पदाचा अवामन केल्याचा ठपका ठेवला आहे. माझ्या ज्या कृतीला ते अपराध या व्याख्येत बसवू इच्छितात मुळात ती अत्यंत नकळतपणे अनाहूत झालेली चूक आहे. ज्या अनाहूतपणे सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोगाकडे विचारणा करू म्हणाले किंवा देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू यांनी त्यांचा उल्लेख अनाहूतपणे पंतप्रधान म्हणून केला.अगदी तितक्यात अनाहुत नकळतपणे माझ्याकडून गोऱ्हे यांचे नाव आले. ही चूक नक्कीच आहे पण दंडनीय अपराध नाही. पण तरीही माझ्या कृतीला अपराध ठरवण्याची अहमहमिका सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडून सुरू आहे असं अंधारेंनी पत्रात म्हटलं.
दरम्यान, प्रिय लोकशाही माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल तर मी निश्चितपणे बिनशर्त माफी मागायला हवी. पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत परंतु निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी माफी अजिबात मागणार नाही. भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगावास पत्करेन असं सुषमा अंधारे यांनी सांगितले.