"भाजपला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर..."; रामदास कदमांवर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 03:05 PM2024-08-19T15:05:18+5:302024-08-19T15:21:18+5:30

रामदास कदमांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Will talk to CM Eknath Shinde about Ramdas Kadam says Deputy Chief Minister Devendra Fadnavis | "भाजपला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर..."; रामदास कदमांवर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

"भाजपला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर..."; रामदास कदमांवर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

Devendra Fadnavis on Ramdas Kadam : विधानसभा निवडणकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार रामदास कदम यांनी केलेल्या विधानांमुळे भाजप संतप्त आहे. रामदास कदम यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरुन मंत्री रवींद चव्हाण यांना लक्ष्य केलं. रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री असून त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे असं रामदास कदम म्हणाले. एवढ्यावरच न थांबता राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर युती तोडावी, असेही रामदास कदम म्हणाले. यावरुन आता रामदास कदमांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री असून त्यांना आवर घाला. ते युती तोडण्याचं काम करतायेत. देवेंद्र फडणवीसांनी चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदमांनी केली.  दापोलीमध्ये भाजप कार्यकर्ते सहकार्य करत नाही. युतीमध्ये तुमच्या राक्षसी महत्वाकांक्षा असतील तर युती तोडून स्वतंत्र लढा, असेही रामदास कदम यांनी म्हटलं. रामदास कदमांच्या या वक्तव्याने भाजप नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत भाष्य केलं आहे.

"असले आरोप करणं कोणत्या युतीधर्मात बसतं? रामदास कदम यांचे काही म्हणणं असेल तर ते त्यांनी अंतर्गत मांडले पाहिजे. अशा प्रत्येक वेळी भाजप आणि नेत्यांना वेठीस धरणं यातून चांगली भावना तयार होत नाही. रामदास कदम यांचे काय म्हणणं आहे हे समजून घेऊन आणि त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करेन. रामदास कदम असं वारंवार टोकाचं बोलतात. त्यामुळे आमची मने देखील दुखावली जातात. शेवटी आम्ही देखील माणसं आहोत आणि ५० गोष्टी आम्हाला देखील त्यांच्या उत्तरासाठी बोलता येतील. जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी पथ्य पाळलं पाहिजे. वारंवार भाजपला असं बोलणं आम्हाला मान्य नाही. यासंदर्भात मी स्वतः एकनाथ शिंदेसोबत बोलणार आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले रामदास कदम?

"गेल्या १४ वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत नाही. चाकरमान्यांचे हाल होतात. समृद्धी महामार्ग तीन वर्षात होतो. मग हा महामार्ग का नाही? रवींद्र चव्हाणांना शिवसेनेची एलर्जी आहे. दापोलीत मुस्लिम आणि बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. लोकसभेत सर्व मुस्लिम बांधवांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात मतदान केले. आम्ही ३५ वर्षे घडाळ्याच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे आमच्या लोकांची अडचण झाली. मी जिवाच रान केलं. रात्रंदिवस काम केलं. याला सुनील तटकरे साक्षीदार आहेत. आम्ही काम केलं नसतं तर ३० हजारने कमी मतदान झाल असतं. पण विधानसभेत चित्र वेगळ असेल. पुणं आमचं, नाशिक आमचं, ठाणे आमचं असं चित्र लोकसभेला होतं. युतीमध्ये तुमच्या राक्षसी महत्वाकांक्षा असतील तर युती तोडून स्वतंत्र लढा," असे रामदास कदम यांनी म्हटलं.
 

Web Title: Will talk to CM Eknath Shinde about Ramdas Kadam says Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.