संसदेत मिळणार आता गुळाचा चहा?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 05:06 AM2020-02-10T05:06:00+5:302020-02-10T05:06:31+5:30
भावेश ब्राह्मणकर । लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशाच्या लोकशाहीचा गाडा चालणाऱ्या संसदेत लवकरच गुळाचा चहा देण्यात यावा, ...
भावेश ब्राह्मणकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशाच्या लोकशाहीचा गाडा चालणाऱ्या संसदेत लवकरच गुळाचा चहा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सांगलीच्या दोघा शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष भेट घेऊन गळ घातल्याने पंतप्रधानांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
गुळाचा चहा आरोग्यदायी आहे. तसेच, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गुळाच्या चहाचा प्रचार-प्रसार करण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील संजीव कुलकर्णी आणि भूपाल खोत या दोन शेतकºयांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गुळ हा आयुर्वेदिक असून त्यामुळे शरीराला लोह आणि खनिज मिळत असल्याने आयुर्वेदिक गुळाला महत्त्व देणे गरजेचे आहे. संसद भवनासह सर्व मंत्रालयांच्या कॅन्टीनमध्ये गुळाचा चहा देण्यात यावा, अशी विनंती या दोन्ही शेतकºयांनी केली. शरीरात अतिरिक्त साखर वाढणे किंवा मधुमेहाचा आजार होण्यापासून प्रतिबंध त्यामुळे लागू शकतो. याचा थेट परिणाम कृषी अर्थव्यवस्थेवर होणार आहे.
ऊस उत्पादकांना व गूळ बनविण्यापासून त्याची विक्री करणाºयांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. आपणही मन की बातच्या माध्यमातून देशवासीयांना आवाहन केले तर गुळाचा चहा अतिशय लोकप्रिय होऊ शकतो. तसेच, उत्तर प्रदेशातील साखर संस्थेद्वारे गुळाची जनजागृती देशपातळीवर केली जावी, अशी मागणी कुलकर्णी आणि भूप यांनी केली आहे.
पंतप्रधानांनी आमच्या विनंतीला मान दिला आहे. त्यामुळे लवकरच संसदेत गुळाचा चहा मिळेल, अशी खात्री आहे.
-भूपाल खोत, शेतकरी, सांगली