बंगळुरुमधील बैठकीत सीमाप्रश्न मांडणार की टोमणे मारणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 01:05 PM2023-07-18T13:05:25+5:302023-07-18T13:06:24+5:30
Chandrasekhar Bawankule's question to Uddhav Thackeray: बंगळुरू दौऱ्यावरून भाजपाने ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. .
आज बंगळुरूमध्ये होणाऱ्या भाजपाविरोधी पक्षांच्या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बंगळुरूमध्ये दाखल झाले आहेत. तिथे त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. दरम्यान, बंगळुरू दौऱ्यावरून भाजपाने ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच कर्नाटकमध्ये भाजपाचं सरकार असताना सीमाप्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे उद्धव ठाकरे बंगळुरूमधील बैठकीत सीमाप्रश्न मांडणार की टोमणे मारणार, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे.
उद्धव ठाकरेंच्या बंगळुरू दौऱ्यावर टीका करताना केलेल्या ट्विटमध्ये चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कोर्टाच्या निर्णयापर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी विधान परिषदेत करणारे तुम्ही या बैठकीत सीमाप्रश्न मांडणार आहात की नाही? त्याबाबत काही भूमिका घेणार आहात की नाही? की, फक्त महाराष्ट्रात "टोमणे" मारणार, हात वर करून भाषणबाजी करणार आहात? की, पुन्हा मूग गिळून बसणार? असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याचा "किमान समान कार्यक्रम" घेऊन बंगरुळूमध्ये गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आज आली आहे. उद्धवजी, ज्या ठिकाणी तुमच्या हजेरीत विरोधकांची ही बैठक होत आहे, तिथे हिंदू विरोधासाठी, हिंदू मनोधैर्य खच्चीकरणासाठी सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार टपून आहे.
भाजपाने सरकार असताना मंजूर केलेला" धर्मांतर विरोधी कायदा" नव्या काँग्रेस सरकारने रद्द केला आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाने यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. ज्या ठिकाणी ही बैठक होत आहे, तिथे राष्ट्रएकतेच्या विचारांवर घाला घालण्यात येत आहे.
तुम्ही सहभागी झाले! उद्धवजी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचे पाईक आहोत, असे सांगणारे तुम्ही यावर काही बोलणार आहात की नाही? असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे.