नवीन समीकरणांची जादू चालेल? पवारांकडे योग्य वेळी संधी साधायचे कसब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:43 PM2024-10-17T12:43:09+5:302024-10-17T12:44:26+5:30
दुर्धर रोगावर लीलया मात करणारे पवार आज मोदी-शाह-फडणवीस यांच्यासह शिंदे-अजित पवारांविरुद्ध शड्डू ठोकून उभे आहेत.
एक-दोन नव्हे तर तब्बल साठ वर्षांच्या राजकीय आयुष्यात अनेक वादळे झेलण्याचा अनुभव असलेले ८३ वर्षीय दिग्गज नेते शरद पवार आता विधानसभा निवडणुकीचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. साथ सोडून गेलेल्या पुतण्याला त्यांनी लोकसभा निवडणुकीत मात दिली. त्याची पुनरावृत्ती करायला ते निघाले आहेत. दुर्धर रोगावर लीलया मात करणारे पवार आज मोदी-शाह-फडणवीस यांच्यासह शिंदे-अजित पवारांविरुद्ध शड्डू ठोकून उभे आहेत.
२०१९ मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी अशा अफलातून महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारच होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. पुतण्याकडे गेलेल्या एकेकाला आपल्याकडे कौशल्याने ओढण्याचे काम सध्या ते करत आहेत. शिवाय अजित पवार सोबत आल्याने भाजपच्या ज्या नेत्यांची त्यांच्या मतदारसंघात अडचण झाली असे नेतेही त्यांच्या गळाला लागत आहेत. दुरावलेल्या राजकीय घराण्यांना ते पुन्हा एकदा जवळ करत आहेत. आपण पुन्हा सत्तेत येण्याच्या मार्गातील मुख्य अडथळा शरद पवार आहेत असेच महायुतीच्या नेत्यांना वाटत असणार. वयाची ऐंशी पार केलेला एक नेता अशी जरब निर्माण करू शकतो हीच शरद पवार या दोन शब्दांची जादू आहे. भाजपची अडचण होईल अशा राजकीय, सामाजिक समीकरणांची मांडणी शरद पवार खुबीने करत आले आहेत.
योग्य वेळी संधी साधायचे कसब
आपापल्या भागात प्रभाव असलेल्या नेत्यांची मोट बांधून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. काँग्रेससोबत आघाडी करून १५ वर्षे ते सत्तेत राहिले.
राजकीय परिस्थितीचा नेमका अंदाज घेत चाणाक्ष राजकारण खेळायचे व योग्य वेळी योग्य संधी साधायची हे त्यांना अचूक जमते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ जागा जिंकून स्ट्राइक रेटबाबत ते अव्वल होते. महाराष्ट्रातील इतर कोणत्याही बड्या नेत्यांपेक्षा अनुभवाने २५ वर्षे पुढे असलेल्या शरद पवार यांची या निवडणुकीत आणि नंतर काय स्थिती असेल याबाबत उत्सुकता आहे.