बंडखोर दगाफटका करणार की बाजी मारणार? दोन मतदारसंघात स्थिती : वाई अन् पाटणमध्ये काॅंटे की टक्कर
By नितीन काळेल | Published: November 4, 2024 07:35 PM2024-11-04T19:35:48+5:302024-11-04T19:36:19+5:30
राज्यात मागील दोन वर्षांत राजकीय उलथापालथी अनेक घडल्या आहेत. त्याचे पडसाद आताच्या विधानसभा निवडणुकीत चांगलेच उमटलेत.
- नितीन काळेल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी आणि महायुतीतील बंडखोरी शमविण्यात चांगलेच यश आले असले तरी वाई आणि पाटण मतदारसंघात दोघांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे संबंधित कोणाला दगाफटका करणार का, स्वत:च बाजी मारणार याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष राहणार आहे. तरीही दोन्ही ठिकाणी काॅंटे की टक्कर होणार हे स्पष्ट आहे.
राज्यात मागील दोन वर्षांत राजकीय उलथापालथी अनेक घडल्या आहेत. त्याचे पडसाद आताच्या विधानसभा निवडणुकीत चांगलेच उमटलेत. महायुती आणि महाविकास आघाडीतून अनेकजण इच्छुक होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. आघाडी तसेच युतीतील अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरले. मनधरणीनंतर काहीजणांनी अपक्ष लढणे स्वीकारले. यामध्ये वाई आणि पाटण मतदारसंघातील बंडखोरी प्रामुख्याने समोर आलेली आहे.
वाई मतदारसंघातून शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी लढण्याची तयारी केली होती. पण, जागावाटपात मतदारसंघ पक्षाकडे येणार नाही हे लक्षात येताच त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही चाचपणी केल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर त्यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि अपक्ष अर्ज भरला. जाधव यांनी यापूर्वी सातारा लोकसभा तसेच वाई विधानसभेचीही निवडणूक लढवलीय. अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रीय आहेत. यामुळे त्यांची उमेदवारी युती की आघाडीच्या उमेदवाराला मारक ठरणार, का तेच बाजी मारणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
पाटण मतदारसंघ आघाडीत उध्दवसेनेकडे गेला. याठिकाणी हर्षद कदम उमेदवार आहेत. तर विरोधात शिंदेसेनेकडून पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत. पण, याठिकाणी आघाडीतील राष्ट्रवादीतून सत्यजितसिंह पाटणकर अपक्ष रिंगणात आहेत. पाटणकर यांचा स्वत:चा गट आहे. या गटाची ताकद त्यांच्या पाठिशी राहील. तसेच आघाडीतील राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचीही छुपी ताकद सत्यजित यांना मिळण्याची अटकळ बांधली जात आहे. यामुळे निवडणुकीत पारंपरिकप्रमाणे देसाई आणि पाटणकर यांच्यातच प्रामुख्याने सामना होण्याची शक्यता आहे.