ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:33 IST2025-04-19T13:32:39+5:302025-04-19T13:33:08+5:30
राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या युतीसाठी हात पुढे केला आहे.

ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
MNS Raj Thackeray: "कुठलीही मोठी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आमच्यातील वाद खूप किरकोळ आहे. त्यासमोर महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वावासाठी आमच्यातील वाद आणि बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं, या गोष्टी कठीण नाहीत, पण प्रश्न फक्त इच्छेचा आहे," असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या युतीसाठी हात पुढे केला आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत राज यांनी हे वक्तव्य केलं आहे.
शिवसेना आणि तुमची पुन्हा युती होऊ शकते का? असा प्रश्न मुलाखतीदरम्यान महेश मांजरेकर यांनी विचारला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, "एकत्र येणं कठीण नाही. आपण महाराष्ट्रासाठी लार्जर पिक्चर पाहणं गरजेचं आहे आणि ते मी पाहतच आहे. माझं तर म्हणणं आहे की, महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय पक्षातील सर्व मराठी नेत्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा," अशी भावना राज यांनी व्यक्त केली. तसंच महाराष्ट्राच्या भल्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यास मला अडचण नसल्याचं त्यांनी सुचवलं आहे.
"...तर महाराष्ट्राने उद्धव ठाकरेंना तसं सांगावं"
मुलाखतीत राज ठाकरे पुढे म्हणाले की, "शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर माझा विचार होता की आपण बाळासाहेब सोडून कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही. पण शिवसेनेत असताना मला उद्धवसोबत काम करायला काही प्रॉब्लेम नव्हता. मात्र मी त्यांच्याबरोबर काम करावं, अशी समोरच्याची इच्छा आहे का?" असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. त्यावर महेश मांजरेकरांनी "महाराष्ट्राची तशी इच्छा आहे" असं म्हटलं. मांजेकर यांच्या या टिपण्णीवर भाष्य करत "आमची युती व्हावी, अशी महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने त्यांना (उद्धव ठाकरेंना) जाऊन सांगावं तसं. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मी माझा इगो कधी मध्ये आणत नाही, आणला पण नाही," असं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी दिली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा राजकीय युतीसाठी हात पुढे करण्यात आल्याने उद्धव ठाकरे यावर कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.