शिवसेनेचे दोन्ही गट भविष्यात एकत्र येणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 11:09 AM2023-04-10T11:09:32+5:302023-04-10T11:10:18+5:30
कोण काम करते आणि संकटाच्या काळात त्यांच्यासोबत कोण उभं राहते हे शिवसैनिकांना माहिती आहे. मूळ शिवसैनिक हा आमच्यासोबत आहे असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला
मुंबई - आपल्या मंत्री, समर्थक आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा केला. प्रभू रामाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे सर्वच आमदार पोहचले. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व होते. बाळासाहेबांचा विचार आम्हीच पुढे घेऊन जात असल्याचा दावा सातत्याने शिंदे आणि त्यांचे आमदार करत आहेत. आम्ही हिंदुत्वाच्या विचारधारेवर चालत आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भविष्यात शिवसेनेतील दोन्ही गट एकत्र येतील का यावरही त्यांनी स्पष्ट शब्दात मत मांडले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भविष्यात ठाकरे-शिंदे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता नाही. आम्ही हिंदुत्ववादी विचारधारेवर पुढे जात आहोत. त्यांची विचारधारा वेगळी आहे. २०१९ मध्ये हिंदुत्वाची समान विचारधारा असणाऱ्या भाजपासोबत आमची नैसर्गिक युती झाली होती. निकालानंतर ही युती तोडून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवले ज्यांनी राम मंदिर बांधकामाला विरोध केला होता असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत कोण काम करते आणि संकटाच्या काळात त्यांच्यासोबत कोण उभं राहते हे शिवसैनिकांना माहिती आहे. मूळ शिवसैनिक हा आमच्यासोबत आहे असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला. तर सुप्रीम कोर्टात सध्या जी सुनावणी झाली. त्याचा निकाल जो काही असेल तो संविधान आणि लोकशाहीच्या चौकटीत असेल. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक निर्णयाचं सन्मान करतो असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
दरम्यान, शरद पवारांनी अदानींबाबत जे काही विधान केले ते विचार करून केले आहे. देशात उद्योग यायला हवेत. हिंडेनबर्गसारख्या संस्था काही प्रश्न उभे करत असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी. सुप्रीम कोर्टाने अदानी प्रकरणात पूर्ण तपास करावा. परंतु एका रिपोर्टवरून कुणा एकाला टार्गेट करणे योग्य ठरणार नाही. शरद पवारांनी जे विधान केले त्यावरून त्यांच्याशी आघाडीबाबत संदर्भ जोडू नये असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.