‘वंचित फॅक्टर’ यंदाही निर्णायक ठरणार का? तिसरी आघाडी ‘परिवर्तन महाशक्ती’ ठरणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:59 PM2024-10-17T12:59:55+5:302024-10-17T13:00:04+5:30
आंबेडकरांच्या उमेदवारांमुळे फटका बसून मविआचे उमेदवार पडतात, असा अनुभव गेल्या काही निवडणुकांत आलेला होता... राज्यात सध्या दोनच मोठे राजकीय पर्याय आहेत, एक म्हणजे महायुती आणि दुसरी महाविकास आघाडी. आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी नवीन पर्याय म्हणून समोर आली आहे...
कधी स्वबळ तर कधी कोणासोबत जाण्याचा प्रयोग करत राजकारण करणारे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी यंदाची निवडणूक ही सत्त्वपरीक्षाच असेल. आंबेडकरांच्या उमेदवारांमुळे फटका बसून मविआचे उमेदवार पडतात, असा अनुभव गेल्या काही निवडणुकांत आलेला होता.
पण यंदा लोकसभेला वंचित फॅक्टरवर मात करत मविआने यश मिळविले. वंचितला मिळणारी मते मोठ्या प्रमाणात घटली. परंतु तो अपवाद होता, हे सिद्ध करण्याची आंबेडकर यांच्यासाठी ही निवडणूक संधी असेल. शिवसेना, एमआयएम, कम्युनिस्ट, काँग्रेस असे बरेच मित्र आंबेडकर यांनी त्या-त्या वेळी बदलले. फक्त भाजपसोबत ते थेट कधीही गेले नाहीत.
तिसरी आघाडी ‘परिवर्तन महाशक्ती’ ठरणार का? -
राज्यात सध्या दोनच मोठे राजकीय पर्याय आहेत, एक म्हणजे महायुती आणि दुसरी महाविकास आघाडी. आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी नवीन पर्याय म्हणून समोर आली आहे. माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, माजी आमदार वामनराव चटप, शंकरअण्णा धोंडगे असे नेते या ‘परिवर्तन महाशक्ती’ मध्ये एकत्र आले आहेत. या आघाडीची १७ ऑक्टोबरला पुण्यात बैठक होईल. आणखी काही पक्ष सोबत यावेत असे प्रयत्न केले जात आहेत. संभाजीराजे छत्रपती यांचे वडील छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार आहेत. तरी त्यांच्या पुत्राने राजकारणाची वेगळी वाट धरत महायुती, महाविकास आघाडीपासून सुरक्षित अंतर ठेवले आहे.