भाजप-मनसे युती होणार का?; प्रविण दरेकर म्हणाले, "येणाऱ्या काळात..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 09:50 PM2022-04-02T21:50:46+5:302022-04-02T21:52:24+5:30
राज ठाकरे यांची भूमिका भाजपच्या विचारधारेला सुसंगत, प्रविण दरेकर यांचं वक्तव्य.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. याशिवाय त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्यही केलं. यावर भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनीदेखील आपली प्रतिक्रिया देत त्यांचं भाषण हे सर्वस्पर्शी आणि भविष्याचा वेध घेणारं होतं असं म्हटलं आहे.
"राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका यानिमित्तानं अधोरेखित झाल्याचं दिसलं. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत, राज्यातील सरकारच्या बेजबाबदार कामकाजावर त्यांनी ताशेरे ओढले. सुरक्षेच्या संदर्भातही त्यांनी भाष्य केलं. मदरशांमध्ये काय चाललंय याची शोध घेण्याची आवश्यकता आहे म्हणाले. माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही ते आवडलं. सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांनी लक्ष वेधलं," असं दरेकर यावेळी म्हणाले. एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
"भारतीय जनता पक्षाची विचारधारा, हिंदुत्वाची भूमिका, महाराष्ट्र मागे चाललाय यासंदर्भातील भूमिका अशी मिळती जुळती भूमिका भाजपचीही आहे. येणाऱ्या काळात काय होईल हे माहित नाही. परंतु निश्चितच त्यांची भूमिका भाजपच्या विचारधारेला सुसंगत आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात चिंता करणारी आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेवर टीका केली. आमच्या दृष्टीनं त्यांच्या भूमिका स्वागतार्ह आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं चांगल्या वाटत असल्याचंही ते म्हणाले.