धनगर समाजाच्या मागण्यासंदर्भात तोडगा निघणार? आज मुख्यमंत्र्यांसोबत आंदोलकांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 09:35 AM2024-09-15T09:35:35+5:302024-09-15T09:36:50+5:30
Dhangar community hunger strike : शासनाच्या शिष्टमंडळाने शनिवारी (दि.१४) उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
Dhangar community hunger strike : पंढरपूर : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा, या मागणीसाठी सहा दिवसांपासून सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींचे टिळक स्मारक, पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी आज (१५ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहावर दुपारी २ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शासनाच्या शिष्टमंडळाने शनिवारी (दि.१४) उपोषणकर्त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सह्याद्री अतिथिगृहावर याबाबत बैठक ठेवली असून त्यातून समाधानकारक तोडगा निघेल, असे शिष्टमंडळाने सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.
आजच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बैठकीसाठी धनगर समाजाचे प्रतिनिधी म्हणून अॅड. सुभाष गोफणे, अनिल झोरे, सुभाष मस्के, बिरू कोळेकर, पंकज देवकते, प्रशांत घोडके, आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील हे मुंबईला रवाना झाले आहेत. याच सोबतच या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, शंभूराजे देसाई, अतुल सावे आणि विजय गावित हे मंत्री उपस्थित असणार आहेत.
या बैठकीचे आयोजन इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे असून आज रविवार असला तरी आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता ही बैठक आज घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची प्रमुख मागणी असून यात अनेक कायदेशीर अडचणी असल्याने या बैठकीसाठी शासनाकडून कायदे तज्ज्ञांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.