स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पडणार उभी फूट?; राजू शेट्टींच्या भूमिकेवर मोठी नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 10:20 AM2023-08-03T10:20:21+5:302023-08-03T10:30:54+5:30

नेतृत्वाकडून पाठबळ दिले जात नाही अशी खंत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत बोलून दाखवली.

Will there be a vertical split in the Swabhimani Shetkari Sanghatana?; A big displeasure with Raju Shetty's role | स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पडणार उभी फूट?; राजू शेट्टींच्या भूमिकेवर मोठी नाराजी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पडणार उभी फूट?; राजू शेट्टींच्या भूमिकेवर मोठी नाराजी

googlenewsNext

प्रविण मरगळे

मुंबई – राज्याच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादीसारखे प्रमुख प्रादेशिक पक्षात फूट पडून २ गट तयार झालेत. तशीच स्थिती शेतकरी प्रश्नावर लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची झाली आहे. राजू शेट्टी यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकांमुळे संघटनेत नाराजीचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी युती तर कधी आघाडी यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचे बोलले जात आहे.

अलीकडेच बुलढाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी अप्रत्यक्षपणे ही नाराजी बोलून दाखवली. नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत, परंतु नेतृत्वच जर कार्यकर्त्यांचे पंख छाटायला लागले तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. आपण ज्यांच्यासोबत राहतो त्याने केसाने गळा कापला तर कसं चालेल. संघटना ही कार्यकर्त्यांनी मोठी केली आहे. चळवळीतून आलेले कार्यकर्ते मेहनतीने संघटना वाढवत आहेत. परंतु नेतृत्वाकडून पाठबळ दिले जात नाही अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत बोलून दाखवली. परंतु मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच काम करणार अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. मागील आठवड्यात राजू शेट्टी बुलढाणा दौऱ्यावर आले होते. परंतु त्याची कुठलीही कल्पना स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिली नाही यावरून ही नाराजी असल्याचे बोलले जाते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी यांच्या बदलत्या भूमिकांमुळे नाराजी आहे. ऊस आणि दूध या आंदोलनाव्यतिरिक्त इतर विषयांवर लक्ष दिले जात नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. रविकांत तूपकर हे स्वतंत्र्यपणे आंदोलन उभे करतायेत. त्यात सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्नासाठी आक्रमकपणे आंदोलन करतायेत. त्यातून संघटनेत समांतर नेतृत्व घडत असल्याने नेतृत्वाकडून रविकांत तुपकर यांना बाजूला सारण्याचे काम केले जातेय असं सांगितले गेले.

दरम्यान, बुलढाण्यात तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा लाठीचार्ज झाला, तणावाची स्थिती निर्माण झाली. अशावेळीही राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देण्यास दिरंगाई केली. कुठेतरी संघटनेतच तुपकरांना डावललं जातंय अशी भूमिका निर्माण होत असल्चाची माहिती समोर येत आहे. तसेच राजू शेट्टी यांच्या बदलत्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. सदाभाऊ खोत यांचे पंख छाटले. देवेंद्र भूयार यांना बाजूला सारले. उल्हास पाटील, माणिक कदम, सयाजी मोरे, पंजाबराव पाटील, दशरथ सावंत हे संघटना सोडून दिले. हे लोकं का सोडून गेले? शेट्टी त्यांच्या मतदारसंघात पूरक अशी भूमिका घेतात. इतक्या वर्षात कापूस, सोयाबीनबाबतीत आक्रमक भूमिका घेतली नाही अशीही नाराजी कार्यकर्त्यांमध्ये आहे असं बोलले जाते.

जिल्हापातळीवर वाद, राज्यातला नाही – राजू शेट्टी

मात्र याबाबत ‘लोकमत ऑनलाइन’शी बोलताना संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कुठलीही नाराजी नाही. बुलढाणा जिल्हा संघटनेत हा वाद आहे. रविकांत तुपकर, प्रशांत डिक्कर यांच्यातील तो वाद आहे. मी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार हे प्रत्येकाला माहिती होते. परंतु दोघेही एकमेकांच्या कार्यक्रमात जात नाहीत. नेता म्हणून मी दोघांच्या कार्यक्रमाला हजेरी लावतो. रविकांत तुपकर यांच्याही बैठकांना, कार्यक्रमांना मी हजर असतो. कार्यकर्त्यांमध्ये कुठेही नाराजी नाही. संघटनेतील अंतर्गत वाद आहे. पुढील आठवड्यात तुपकर आणि डिक्कर या दोघांना कोअर कमिटीसमोर बोलावून चर्चा केली जाईल. यातून जो काही निर्णय असेल दोघांना मान्य करावा लागेल असं शेट्टी यांनी म्हटलं.

Web Title: Will there be a vertical split in the Swabhimani Shetkari Sanghatana?; A big displeasure with Raju Shetty's role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.