‘त्या’ प्राध्यापकांवर कारवाई होणार का?; ५ हजारांहून अधिक प्राध्यापक झाले होते संपात सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 02:21 AM2018-10-13T02:21:50+5:302018-10-13T02:22:08+5:30
विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी पुकारलेला संप तब्बल १६ दिवसांनंतर मागे घेण्यात आला. मात्र, आता संपात सहभागी झालेल्या आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या संपकरी प्राध्यापकांवर उच्च शिक्षण विभागाकडून कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी पुकारलेला संप तब्बल १६ दिवसांनंतर मागे घेण्यात आला. मात्र, आता संपात सहभागी झालेल्या आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या संपकरी प्राध्यापकांवर उच्च शिक्षण विभागाकडून कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एमफुक्टो या प्राध्यापकांच्या संघटनेने २५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबरदरम्यान पुकारलेल्या संपात अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तब्बल १६ दिवसांनंतर काही मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्यात आला. दरम्यानच्या काळात या संपाची गंभीर दखल घेत मुंबईसह राज्यातील प्राध्यापकांची बायोमेट्रिक हजेरी तपासण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालनालयाने दिले. याचा फटका पाच हजारांहून अधिक संपकरी प्राध्यापकांनाच बसणार असल्याने आंदोलनात सहभागी होऊ नका, असे आवाहनही शिक्षकांच्या काही इतर संघटनांनी केले होते. मात्र, प्राध्यापक संपावर ठाम राहिल्याने आता त्यांची हजेरी तपासून कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे. उच्च शिक्षण संचालनालयाकडून अद्याप कारवाईचे निर्देश नाहीत.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून प्राध्यापक विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे कारवाई न झाल्यास हे प्रकार पुढेही सुरूच राहतील, असे मत काही पालक संघटनांनी व्यक्त केले आहे.
दिवस भरून काढणार
प्राध्यापकांनी पुकारलेल्या १५ दिवसांच्या संपातील ३ दिवस सुट्टीचे होते. त्यातील १२ दिवसांत प्राध्यापक संपात सहभागी झाले होते. या दिवसांत विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान झाले आहे असे उच्च शिक्षण विभागाला वाटते, त्या दिवसांसाठी विद्यापीठाने एक वेळापत्रक तयार करावे. प्राध्यापक ते दिवस भरून काढतील, असा प्रस्ताव एमफुक्टो या प्राध्यापक संघटनेने शिक्षण विभागाला दिल्याची माहिती राज्य अध्यक्षा ताप्ती मुखोपाध्याय यांनी दिली.