अकरावीच्या प्रवेशनिश्चितीसाठी हाेणार परीक्षा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 06:53 AM2021-04-22T06:53:35+5:302021-04-22T06:53:47+5:30
दहावीत सरसकट उत्तीर्णांमुळे पेच; शिक्षण विभागाकडून पर्यायांची चाचपणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द झाल्याने एसएससी बोर्डाचे १६ लाख विद्यार्थी आणि इतर मंडळाचे अशा तब्बल १७ लाख विद्यार्थ्यांची अकरावीच्या प्रवेशासाठी झुंबड उडेल. त्यामुळे मूल्यमापनाचे निकष बदलणे किंवा अकरावीसाठी प्रवेश परीक्षा घेण्यासारख्या पर्यायांची शिक्षण विभाग चाचपणी करत असल्याचे समजते. आयटीआय, अकरावी, पॉलिटेक्निकच्या साडेआठ लाख जागा असल्याने प्रवेश मिळवण्यात विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे.
काही वर्षे वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा राबवूनही अकरावीच्या हजाराे जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे अकरावी किंवा तंत्रशिक्षण पदविकेच्या प्रवेशाला अडचणी निर्माण होणार नाहीत. मात्र, नामवंत महाविद्यालयातील प्रवेशासाठीची चढाओढ आणखी तीव्र होईल, असे मत शिक्षण सुधारणा मोहीम (सिस्कॉम)च्या संचालिका वैशाली बाफना यांनी मांडले.
गुणच देण्यात आले नसतील तर श्रेणीच्या साहाय्याने प्रवेशप्रक्रिया राबविताना गोंधळ उडू शकतो, अडचणी निर्माण होऊ शकतात. गुणांचे समानीकरण तर अवघडच असल्याचे त्यांनी सांगितले.
असे असू शकतात पर्याय
nअंतर्गत मूल्यमापन करताना सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या अंतर्गत मूल्यमापनाचे निकष बघून राज्यातील मंडळाच्या विद्यार्थ्यांना गुण देऊन उत्तीर्ण करून अकरावी प्रवेश गुणांच्या आधारे दिला जाऊ शकतो.
nराज्य मंडळाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांमध्ये समानता आणण्यासाठी बहुपर्यायी परीक्षा घेऊन अंतर्गत मूल्यमापनाचाही पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो, जेणेकरून त्या गुणांच्या आधारे अकरावी प्रवेश दिला जाऊ शकेल.
nनववी आणि दहावीचे संयुक्त मूल्यमापन करून अंतर्गत गुणांच्या आधारे निकाल दिला जाऊ शकतो. याच निकालाच्या आधारावर अकरावीसह इतर प्रवेश प्रक्रियांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.
शैक्षणिक
प्रगतीचे काय?
राज्य मंडळ स्वायत्त असताना, त्याची व्याप्ती मोठी असताना इतर मंडळांच्या निर्णयामागे फरपटत जाण्यापेक्षा जूनपर्यंत वाट पाहून दहावीची परीक्षा घ्यायला हवी होती. विद्यार्थी मागील वर्षी अंतर्गत मूल्यमापनाने दहावीत आले, आता तसेच अकरावीत जाणार. त्यांची शैक्षणिक प्रगती किती झाली, हे कुठेच अधोरेखित होत नसल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मांडले.