सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल का? शेतकऱ्याची कविता शेअर करत जयंत पाटलांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 12:36 PM2023-11-24T12:36:22+5:302023-11-24T12:48:23+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिंगोली येथील शेतकऱ्याचा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवरून ट्विट केला आहे.
मुंबई : या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. शेतीला पाणी नसल्याने पिके जगवायची कशी या विवंचनेत शेतकरी आहे. त्यात डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने जगायचे कसे? हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यामुळे डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी मराठवाड्यातील हिंगोली येथील शेतकऱ्यांनी थेट आपले अवयव विक्रीला काढले आहेत. तसेच, हे अवयव विकत घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात किडनीसाठी ७५ हजार, लिव्हरसाठी ९० हजार, डोळ्यासाठी २५ हजार किंमत लावण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी राज्यातील शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिंगोली येथील शेतकऱ्याचा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवरून ट्विट केला आहे. राजकुमार नायक असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा कवितेतून मांडली आहे. जयंत पाटील यांनी हा व्हिडीओ शेअर करत आपली भावना व्यक्त केली आहे. जयंत पाटील म्हणाले की, हिंगोली शेतकरी राजकुमार नायक यांनी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची व्यथा कवितेतून मांडली आहे. इतकेच नवे तर असंख्य अडचणींचा सामना करत असल्याने त्यांनी आपले अवयव विक्रीला काढले असल्याचे पत्र देखील मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. राजकुमार यांची ही कविता प्रचंड अस्वस्थ करणारी आहे. पण सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात या कवितेतून काही प्रकाश पडेल का? हा खरा प्रश्न आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दुसरीकडे कर्जासाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे सांगत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भाजपच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे. कर्जफेडीसाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, पण राज्यातील भाजप सरकारला त्याची लाज वाटत नाही, असा घणाघाती हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.