अपघातांमुळे एक्स्प्रेस वे बंद करणार का?

By admin | Published: June 22, 2016 01:57 AM2016-06-22T01:57:46+5:302016-06-22T01:57:46+5:30

कंपन्या-औद्योगिक विभाग स्थलांतरित करण्याचा कल्याण-डोंबिवली पालिकेचा ठराव चुकीचा आहे. दुर्घटनेचे मूळ कारण शोधून भविष्यात दुर्घटना घडणार नाही, हे पाहणे महत्वाचे आहे.

Will the train stop due to accidents? | अपघातांमुळे एक्स्प्रेस वे बंद करणार का?

अपघातांमुळे एक्स्प्रेस वे बंद करणार का?

Next

कल्याण : कंपन्या-औद्योगिक विभाग स्थलांतरित करण्याचा कल्याण-डोंबिवली पालिकेचा ठराव चुकीचा आहे. दुर्घटनेचे मूळ कारण शोधून भविष्यात दुर्घटना घडणार नाही, हे पाहणे महत्वाचे आहे. एका स्फोटामुळे संपूर्ण उद्योग स्थलांतरित करायचे असतील तर याच न्यायाने वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे एक्स्प्रेस वे बंद करावा लागेल, अशी कडवट टीका कामा या उद्योजकांच्या संघटनेने केली आहे.
कल्याण-डोंबिवलीच्या सोमवारच्या महासभेत प्रोबेस कंपनीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली एमआयडीसी विभागातील औद्योगिक पट्टा रद्द करून कंपन्यांचे महापालिका हद्दीबाहेर स्थलांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्याला कामा (कल्याण डोंबिवली मन्युफकचरर्स असोसिएशन) या कारखानदारांच्या संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्यावेळी संघटनेने या दुर्घटनेविषयी प्रथमच मंगळवारी आपली बाजू मांडली. कामाचे
अध्यक्ष संजीव कटेकर, उपाध्यक्ष मुरली अय्यर याच्यासह अन्य आजी-माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जवळजवळ सर्वच व्यवसायात काही ना काही धोका असतोच. टीबी झालेल्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसनाही त्या रोगाचा धोका असतो, विमान अपघातातही शेकडो प्रवासी मरण पावतात. अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणे आपल्या हातात असते. तरीही त्या होतात. दुर्घटना कोणी मुद्दाम घडवत नाही. तो अपघात असतो. प्रोबेस कंपनीच्या दुर्घटनेचेही समर्थन करण्याचा आमचा हेतू नाही, असे म्हणणे कामा संघटनेने मांडले.
रासायनिक कंपन्यांभोवती किमान दोनशे मीटर्सचा मोकळा संरक्षित पट्टा (बफर झोन) ठेवणे आवश्यक असताना नियोजन करणाऱ्या सरकारी यंत्रणेने त्याची तरतूद केली नाही. ही घोडचूक या अपघाती घटनांच्या मुळाशी असल्याकडे कामाने लक्ष वेधले.
आपल्या कंपनीत दुर्घटना घडावी आणि हानी व्हावी अशी कुठल्याही कारखानदाराची इच्छा नसते. तो अपघात असतो. परंतु घटना घडल्यानंतर संबंधित मालकावर गुन्हे दाखल करून त्याला गुन्हेगाराच्या भूमिकेत उभे केले जाते, हे चुकीचे असल्याचे म्हणणे संघटनेने मांडले. प्रोबेस कंपनीत झालेला अपघात हे कोडे असून तेथे पडलेला मोठा खड्डा हे गूढ आहे. म्हणूनच या अपघाताची सक्षम यंत्रणांकडून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी संघटनेने केली. (प्रतिनिधी)
शनिवारी घेणार सुरक्षेची प्रतिज्ञा
कामा संघटनेच्या डोंबिवली कार्यालयात शनिवारी, २५ जूनला सुरक्षेची प्रतिज्ञा घेतली जाणार आहे.
सुरक्षिततेचा प्रसार करण्यासाठी आणि असे अपघात पुन्हा घडू नयेत, यासाठी मालक, अधिकारी आणि कामगारांना प्रशिक्षण देण्यास आम्ही बांधील आहोत, हे दाखवून देण्यासाठी प्रतिज्ञा घेतली जाणार आहे.
भविष्यात असे अपघात होऊ नयेत म्हणनू काळजी घेऊ, सुरक्षेच्या नियमांचे पालन करू, कामगारांना सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण देऊ, उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी सुरक्षिततेशी तडजोड करणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली जाणार आहे.

‘त्या’ ठरावाचे भवितव्य अधांतरी
प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटातील हानीमुळे औद्योगिक पट्टा रद्द करून कंपन्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या केडीएमसीच्या महासभेत मंजूर करण्यात आला असला, तरी अशा अशासकीय ठरावांचे भवितव्य हे प्रशासनाच्या भूमिकेवर अवलंबून आहे. त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्हच शंकाच आहे.
हा प्रस्ताव पालिका प्रशासनाने सादर केलेला नाही. तर सभागृहनेते राजेश मोरे यांनी त्याची सूचना दाखल केली होती. सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याला मान्यता दिली असली तरी हा अशासकीय ठराव आहे. त्यामुळे तो पालिका प्रशासनाकडे पाठवावा लागेल. त्यानंतर सर्व बाजूंनी विचार करून योग्य वाटल्यास प्रशासन तो शासकीय स्वरूपात महासभेला पाठवेल. मंजुरीसाठी संबंधित अशासकीय ठराव सरकारकडेही पाठविला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने जरी कंपन्या हद्दीबाहेर घालविण्याचा प्रस्ताव मान्य केला असला, तरी ही सध्या त्या प्रस्तावाचे भवितव्य अधांतरी आहे.

Web Title: Will the train stop due to accidents?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.