उदयनराजे होणार राज्याच्या राजकारणात सक्रिय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 02:31 PM2019-09-21T14:31:56+5:302019-09-21T14:32:26+5:30
विधानसभेसोबत लोकसभा पोटनिवडणूक जाहीर झाली नसल्यामुळे उदयनराजे यांचे टेन्शन वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून आचारसंहिताही लागू झाली आहे. मात्र या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले छत्रपती उदनयराजे यांना धक्का बसला आहे. उदयनराजे यांनी सातारा लोकसभा मतदार संघाच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये केला आहे. मात्र लोकसभेची पोट निवडणुक विधानसभा निवडणुकीसोबत नसल्याने त्यांना धक्का बसला आहे. परंतु, ते राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले यांनी काही अटीसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या अटी व शर्तीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाची पोट निवडणूक ही विधानसभा निवडणुकी सोबतच व्हावी आणि प्रवेशावेळी नरेंद्र मोदी उपस्थित राहावे, अशा अटी त्यांनी घातल्या होत्या. या दोन्ही अटीपैकी भाजपने दुसरी अटही टाळल्याचे आज स्पष्ट झाले. याआधी उदयनराजे यांच्या प्रवेशावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित नव्हते.
साताऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लोकसभा निवडणूक ही विधानसभेचे सोबतच होईल असे संकेत दिले होते. मात्र निवडणूक आयोगाने विधानसभा मतदारसंघाचा कार्यक्रम जाहीर करताना लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. त्यामुळे उदयनराजे यांना भीती होती ती कायम राहिली आहे. मात्र उदयनराजे यांना भाजपकडून राज्याच्या निवडणुकीत सक्रिय करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थात ते विधानसभा निवडणूक लढविणार नाही, परंतु, भाजपच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ही बाब भाजपच्या लक्षात आली असावी, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान विधानसभेसोबत लोकसभा पोटनिवडणूक जाहीर झाली नसल्यामुळे उदयनराजे यांचे टेन्शन वाढणार असल्याचे बोलले जात आहे.