उद्धव-आदित्य यांची मक्तेदारी मोडणार?; मुख्यमंत्री शिंदे निहार ठाकरे, स्मिता ठाकरेंना नवी जबाबदारी देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 12:01 PM2022-10-06T12:01:06+5:302022-10-06T12:03:15+5:30
निहार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे मोठे सुपुत्र आणि उद्धव यांचे मोठे बंधू बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहे. बाळासाहेबांचा नातू अशी त्यांची ओळख.
मुंबई - दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंकडून सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर 'बाप चोरणारी टोळी' असा शिक्का मारला जात आहे. दसरा मेळाव्याच्या सभेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या लहान नातवावरही टीका केली. बाप मंत्री, कार्टं खासदार आणि आता नातवालाही नगरसेवक करायचंय असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या टीकेमुळे दुखावलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना आणखी एक शह देण्याच्या तयारीत असल्याचं समजतं.
एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात व्यासपीठावर उपस्थित असलेले बाळासाहेब ठाकरेंचे नातू निहार ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांना पुढे आणत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची मक्तेदारी मोडायची रणनीती शिंदे गटात ठरत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीत निहार आणि स्मिता ठाकरेंचा समावेश करत ठाकरेंना 'नहले पे दहला' फेकला जाऊ शकतो.
दादर येथे जुन्या महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकासाठी शासनाकडून स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यास समितीचं गठन २०१६ मध्ये करण्यात आले होते. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही समिती तत्कालीन फडणवीस सरकारने स्थापन केली होती. २५ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्या. त्यानंतर मार्च २०२० मध्ये आदित्य ठाकरेंना स्मारक समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. आता याच समितीत निहार ठाकरेंचा समावेश करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे पितापुत्रांना धक्का देण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे.
कोण आहेत निहार ठाकरे?
निहार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे मोठे सुपुत्र आणि उद्धव यांचे मोठे बंधू बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. बाळासाहेबांचा नातू अशी त्यांची ओळख. निहार व्यवसायाने वकील आहे. राज्यातील सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांच्याकडून लढणाऱ्या वकिलांच्या टीममध्येही निहार ठाकरेंचा समावेश आहे. भाजपाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे ते जावई आहेत.
उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका
काळ बदलतो, तसा रावण बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता, आता ५० खोक्यांचा रावण झालाय. हा ५० खोक्यांचा 'खोकासूर' आहे. माझी शस्त्रक्रिया झाली, तेव्हा माझी बोटही हालत नव्हती. तेव्हा मी ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती, तेव्हा हा 'कट्टपा'(एकनाथ शिंदे) कट करत होता. पण, त्यांना कल्पना नाही, हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. माझ्या शक्तीशी पंगा घेतलेला आहात, देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही. तेजाचा शाप आहे. आई जगदंबा माझ्या पाठीशी आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदेवर केली.
त्याचसोबत शिवसेना संपवायची. हाव ती किती त्याला शिवसेनाप्रमुख व्हायचंय, तुम्ही स्वीकारणार स्वतःच्या वडिलांच्या नावाने मत मिळत नाही. बाप चोरणारी अवलाद आहे. बाळासाहेबांचा चेहरा लावून हे तोतये आले आहेत. किती ओरबडायचे शिवाजी पार्क मिळावे. आता धनुष्यबाण हवा, शिवसेना हवी, शिवसेनाप्रमुख पद हवे असा घणाघातही ठाकरेंनी शिंदेंवर केला.