उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील खालील प्रश्नांचे उत्तर देणार का? नितेश राणेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 05:30 PM2022-05-14T17:30:08+5:302022-05-14T17:32:06+5:30
Nitesh Rane : भोंगा, हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आजच्या सभेत विरोधकांचा समाचार घेऊ शकतात.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईतील वांद्रे पूर्व येथील बीकेसी मैदानात जाहीर सभा होणार आहे. आजच्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे कुणाचा समाचार घेणार? याकडे लक्ष लागून आहे. अनेक मुद्द्यांवरुन गेले काही दिवस राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले आहे.
भोंगा, हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आजच्या सभेत विरोधकांचा समाचार घेऊ शकतात. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या सभेपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंना चार सवाल केले आहेत.
भाजप आमदार नितेश राणे यांनी काही प्रश्न ट्विट केले आहेत. "उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील खालील प्रश्नांचे उत्तर देणार का? की केंद्रावरच जबाबदारी ढकलणार?आता आम्हाला 'हे पाहायचंय" असे म्हणत नितेश राणे यांनी चार प्रश्न विचारले आहेत.
नितेश राणेंनी विचारलेले प्रश्न?
१) महाराष्ट्रातील हिंदूंना धमकी देणाऱ्या आणि औरंगजेबाचा उधोउधो करणाऱ्या ओवैसीवर गुन्हे दाखल करून अटक करणार का?
२) महाराष्ट्रात निर्माण झालेला अतिरिक्त ऊसाचं गाळप करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार की कारखानदारांचा बचाव करणार?
३) शेतकऱ्यांचा पीक विमा बुडवणाऱ्या पीक वीमा कंपन्यांवर कारवाई करणार का?
४) महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर मेगा नोकर भरतीची घोषणा ही फक्त बेरोजगार युवकांसाठी गाजर होती असे मान्य करणार का?
मा.मु.उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील खालील प्रश्नांचे उत्तर देणार का? की केंद्रावरच जबाबदारी ढकलणार?आता आम्हाला 'हे पाहायचंच'.@CMOMaharshtra pic.twitter.com/DeqlRyGJHH
— nitesh rane (@NiteshNRane) May 14, 2022
उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार - विनायक राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभरात फिरतील. लोकांच्या समस्या जाणून घेतील. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसी संवाद साधतील. त्यासाठी विभागवार नियोजन सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. आजच्या सभेनंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली. आमदारांच्या बैठकादेखील सुरू आहे. जूनमध्ये शिवसेनेचा स्थापना दिन आहे. त्यावेळी औरंगाबादमध्ये महामेळाव्याचे आयोजन करण्यात येईल, असेही राऊत यांनी सांगितले.