मोदींच्या स्नेहभोजन कार्यक्रमात नाही जाणार उद्धव ठाकरे?
By admin | Published: March 28, 2017 07:43 AM2017-03-28T07:43:07+5:302017-03-28T08:18:24+5:30
पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - राज्यातील सत्तेत एकत्र नांदणा-या शिवसेना आणि भाजपामधील संबंध दिवसेंदिवस ताणतच असल्याचं दिसत आहे. सत्तेत असूनही वारंवार विरोधकांची भूमिका निभावणा-या शिवसेनेची समजूत काढण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिल्याची माहितीही समोर आली होती.
मात्र, पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे सहभागी होणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्नेहभोजन कार्यक्रमाचे कोणतेही निमंत्रण आलेले नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी स्पष्ट केले. शिवाय, राष्ट्रपती पद निवडणुकीबाबत अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एनडीएतील घटक पक्षांसोबत संबंध टिकून राहावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केल्याची माहिती आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे बोललं जात होतं, मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार ते या स्नेहभोजनासाठी राजधानी दिल्लीला जाणार नसल्याचं कळत आहे.
दरम्यान, पंतप्रधानतर्फे 29 मार्चला आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आल्याची चर्चा केवळ प्रसिद्धी माध्यमांमध्ये आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. शिवाय, एनडीएतील कोणत्याही पक्षाला आतापर्यंत अशा कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याचाही दावाही राऊत यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रपती पद निवडणुकीसाठी भाजपाला शिवसेनेची मदत हवी असल्यास त्यांनी मातोश्रीवर येऊन चर्चा करावी लागेल, असे शिवसेनेच्या खासदारांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रपती निवडीसंदर्भात यापूर्वी दोनदा मातोश्रीवर चर्चा झाल्याची आठवणही त्यांनी करुन दिली आहे.
भाजपा आणि अण्णा द्रमुक यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याने या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पद निवडणुकीत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण शिवसेनेकडे 25, 000 मतं असून भाजपाला 20, 000 मतं कमी पडत आहेत. तर दुसरीकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांना राष्ट्रपती करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
‘भागवत हे राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे’, असे वृत्त लोकमतने सर्वप्रथम दिल्यानंतर खळबळ माजली होती. संजय राऊत यांनी भागवत यांना भाजपाने राष्ट्रपती पदाचे उमेदवार केले तर त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे सांगितले. 'भागवत राष्ट्रपती झाल्यास अखंड हिंदू राष्ट्राची संकल्पना साकार होईल. अयोध्येतील राम मंदिराचे स्वप्न साकार होईल. समान नागरी कायदा देशात येईल आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द होईल. शिवसेनेने नेहमीच या सर्व गोष्टींसाठी आग्रह धरलेला आहे. रा.स्व.संघानेही हीच भूमिका सातत्याने मांडलेली आहे. त्यामुळे आता सरसंघचालकच राष्ट्रपती झाले तर ते त्यांना मिळालेल्या घटनात्मक अधिकारात या सगळ्या गोष्टी करू शकतील', असेही ते म्हणालेत.